मुंबई ब्लॉक!

अनेक विद्यार्थ्यांची नेटची परीक्षा हुकली

ठाणे। दि. ३0 (प्रतिनिधी)

प्रवाशांनी खचाखच भरलेली स्थानके.. कोणती लोकल येणार.. किती वेळात येणार.. कोणत्या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर येणार.. मेगाब्लॉकचे हे चित्र रविवारी आणखी भीषण बनले आणि मुंबई, ठाणेसह नवी मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. ठाणे ते कल्याण या जवळपास ३0 मिनिटांच्या प्रवासासाठी दोन ते अडीच तास प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आणि कुटुंबासह जाणार्‍यांचे प्रचंड हाल झाले. काही प्रवाशांनी लोकलमधून उतरून रेल्वे रुळांतून प्रवास केला; तर भरगच्च रेल्वेतून पडून अक्षय तायडेसह आणखी एकाचा मृत्यू झाला. तसेच या ब्लॉकमुळे काही विद्यार्थ्यांना नेट परीक्षेला मुकावे लागले.

मुंबई - मेगाब्लॉकमुळे राष्ट्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाकडून घेण्यात आलेल्या नॅशनल इलिजिबिलीटी टेस्ट (नेट) या परीक्षेला मुंबईतील अनेक विद्यार्थी वेळेवर उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर आज दिवसभर गोंधळ होता.

सोमय्या महाविद्यालय विद्याविहार, आचार्य मराठे महाविद्यालय चेंबूर आदी महाविद्यालयांसह आठ परीक्षा केंद्रांवर नेटची परीक्षा घेण्यात आली. या नेटच्या परीक्षेला १0 हजार ४३२ विद्यार्थी बसले होते. सकाळी ९ वाजून ३0 मिनिटांनी या परीक्षेच्या पहिल्या पेपरची सुरुवात झाली.

वांद्रे येथील आर.डी. नॅशनल महाविद्यालयात तीन विद्यार्थी १0 वाजून १५ मिनिटांनी पोहोचले. तोपर्यंत पहिल्या पेपरची वेळ संपली होती. यामुळे परीक्षकांनी त्यांना परीक्षेला बसू देण्यास मनाई केली. यामुळे मोठय़ा गोंधळाला सामोरे जावे लागले.

मेगाब्लॉकमुळे तीन विद्यार्थी उपस्थित राहू शकले नाहीत अशी माहिती कळली असली तरी त्यांनी वेळेपूर्वी येणे आवश्यक होते.

- डॉ. हरीचंदन,

मुंबई नेट परीक्षा केंद्र समन्वयक

सोमवारीही हेच हाल!

ठाणे स्थानकातील यार्डाचे काम सोमवारी मध्यरात्रीही ट्राफिक ब्लॉकच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे हेच हाल सोमवारी मुंबईकरांच्या नशिबी राहणार आहेत.