मैफलींनी दिवाळी पहाटचे रंग गहिरे

चिंचवडला शब्दसुरांची मैफल, निगडीत नृत्याविष्कार, रावेतला भक्तिगीते

पिंपरी । दि. १३ (प्रतिनिधी)

पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड, निगडी, प्राधिकरण येथे दिवाळी पहाट मैफली झाल्या. चिंचवडला सुगमसंगीताची मैफल रंगतदार झाली. तर प्राधिकरणात लिटील चॅम्पमधील पंचरत्नांनी धमाल उडवून दिली. पिंपरी-चिंचवड संगीत अकादमीच्या मैफलीत बहारदार नृत्याविष्कार सादर झाला. रावेत येथील भक्तिगीत भावगीतांच्या मैफीलींनी दिवाळी पहाटचे रंग गहिरे झाले.

शाहूनगर : ‘तुझे गीत गाण्यासाठी’, ‘केव्हा तरी पहाटे’,‘लाजून हसणे,’ ‘चांदणे शिंपीत जा,’ ‘रिमझिम गिरे सावन’ अशा हिंदी-मराठी गीतांची मैफल चिंचवड येथे रंगली. निमित्त होते पिंपरी-चिंचवड प्रबोधनच्या वतीने आयोजित दिवाळी पहाटचे.

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात स्वरश्री पुणे निर्मित पराग माटेगावकर व सहकार्‍यांचा गीतशिल्प हा कार्यक्रम (रविवारी) झाला. शब्द संगीत, ताल, लय यांची उत्तम अनुभूती देणार्‍या या कार्यक्रमात ऋषिकेश रानडे, सुवर्णा माटेगावकर, प्रज्ञा देशपांडे, अली हुसैन यांनी विविध गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

ऋषिकेशच्या ‘तिन्ही लोकी आनंदाने’ या बाबूजींच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रज्ञाने ‘केव्हा तरी पहाटे’ हे गीत सादर केले. अली यांनी सादर केलेल्या ‘लाजून हसणे’ या गीताने मैफलीला प्रेमाचा रंग चढविला. धुंद मधुमती हे गीत सुवर्णाने सादर केले. ऋषिकेशने सादर केलेल्या ‘रिमझिम गिरे सावन’ या गीताला रसिकांनी दाद दिली. ‘ये राते ये मौसम’ या ऋषिकेश आणि प्रज्ञा यांनी सादर केलेल्या द्वंद्वगीताने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

प्रज्ञा यांनी ‘दिल चीज क्या है’ तर सुवर्णा यांनी ‘इन्ही लोगोने’ ही गीते सादर करून रसिकांवर मोहिनी घातली. सुमारे तीन तास चाललेल्या मराठी-हिंदी गीतांनी दिवाळी पहाटची मैफल रंगत गेली. कार्यक्रमास उद्योजक कांतिलाल खिंवसरा, मनोहर दीक्षित, जयकुमार चोरडिया उपस्थित होते.

कार्यक्रमात पराग माटेगावकर (संवादिनी), केदार परांजपे (सिंथेसायझर), प्रसाद बोनकर (सतार), राजू जवळकर (तबला), नीलेश देशपांडे (बासरी) यांनी साथसंगत केली. जयप्रकाश राका यांनी प्रास्ताविक केले. डॉ. श्रीरंग गोखले व संदीप कोकीळ यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. माऊली फरांदे यांनी आभार मानले.

लिटील चॅम्पचा कलाविष्कार

आकुर्डी : प्राधिकरणातील श्री गजानन महाराज उद्यानात लिटल चॅम्प्सच्या पंचरत्नांनी रसिकांना संगीत सुरावटीच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात स्वराभिषेक केला.

उपमहापौर राजू मिसाळ यांनी आयोजित केलेल्या दिवाळी पहाट संगीत मैफलीत पंचरत्नांनी विविध गीते सादर करून रसिकांची मने जिंकली. रसिकांच्या मनावर मोहिनी टाकणारे लिटल चॅम्प कार्तिकी गायकवाड, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, रोहित राऊत, प्रथमेश लघाटे यांनी नवीन तसेच जुनी अजरामर गीते या वेळी सादर केली. मराठी गीतांसहीत या वेळी लिटल चॅम्प्सनी प्रसिद्ध अशी हिंदी गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

कार्तिकी, आर्या, मुग्धा, रोहित, प्रथमेश यांनी या वेळी भावगीते, भक्तिगीते व कोळीगीत सादर केले. बालशाहीर अभिनंदन गायकवाड या सहा वर्षांच्या बालकाने या वेळी छत्रपती संभाजीमहाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला. रसिकांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘झी’ सारेगम फेम बासरीवादक अमर ओक यांनी बासरीवर गीत व सारेगमचे शिर्षकगीत सादर केले. कार्तिकी व सहकार्‍यांच्या ‘खंडेरायाच्या लग्नाला’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

बहारदार नृत्याविष्कार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संगीत अकादमीच्या वतीने पहाटे सहाला संत तुकाराम व्यापारी संकुल निगडी येथे दिवाळी पहाट कार्यक्रम झाला.

कार्यक्रमास नगरसेवक मंगेश खांडेकर, शिक्षणाधिकारी विष्णू जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वैजयंती भालेराव सदाफुले यांच्या सुगम संगीताने झाली. ‘नमन तुला शारदे, केव्हा तरी पहाटे, माझी रेणुका माऊली’ अशी एकापेक्षा एक गाणी गाऊन वातावरण धुंद केले. यानंतर मिलिंद रणपिसे यांनी तीनतालात कथकचे विविध प्रकार सादर करून कार्यक्रमात रंग भरला.

नृत्याच्या अखेर पं. बिंदादीन महाराजांचे ‘प्रगटे ब्रीज नंदलाल’ हे भजन सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. त्यानंतर प्रसिद्ध नर्तक डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांनी बिजली सारखे जोरदार कथक नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली. डॉ. कपोते यांनी प्रारंभी लक्ष्मी स्तुती सादर करून ‘एक राधा एक मीरा’ या गाण्यावर मनमोहक अदाकारी पेश केली.

प्रसिद्ध गायिका शोभा जोशी यांच्या गायनाने सांगता झाली. त्यांनी शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन व भजन प्रस्तूत केले. कार्यक्रमास तबला साथ समीर सूर्यवंशी, संतोष साळवे, विनोद सुतार यांनी केली तर हार्मोनियम साथ उमेश पुरोहित, तानपुरा साथ कांचन वैद्य यांनी केली.

रंगली भावगीते-भक्तीगीते

निगडी : ‘विठ्ठ्ला, कुणाचा झेंडा घेवू हाती.., ‘आईच्या कुशीत भरे,रोज माझी शाळा..’, ‘आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्तांना..’, अशी एकापेक्षा एक सरस मराठी गाणी प्रसिद्ध गायक ज्ञानेश्‍वर मेश्राम यांनी आपल्या पहाडी आवाजात गात रिसकांना मंत्नमुग्ध केले.

रावेत-प्राधिकरण नागरिक कृती समिती व मोरेश्‍वर भोंडवे मित्न परिवाराच्या वतीने दिवाळी निमित्त शब्दसुरांच्या झुल्यावर ही दिवळी मैफल झाली. विजय पानसरे, मधूसुधन ओझा, राधिका अत्रे,स्वप्ना पानसरे यांनी नटरंग चित्रपटातील ‘नटरंग उभा..’, हे गाणी गायली.

राधिकाने ‘हि गुलाबी हवा..’, तर गणेश मोरे यांनी ‘पाहिले न मी तुला..’, पानसरे यांनी ‘नावाची गोजिरी..’ ही गीते गायली. ज्ञानेश्‍वर मेश्रामचे आगमन होताच रिसकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. मेश्राम यांनी झेंडा मधील शिर्षक गीतासह ‘विठू माऊली तू..’, ‘खंडेराया तुझं नवस..’, ‘वेडी म्हणतात मला..’ हे भारु ड सादर करु न कार्यक्र मास बहर आणला.कपिल पाटील यांनी मिमिक्र ी करून रसिकांना हसविले. ओझा यांनी राधा हि बावरी..’ ह गीत गायले. राधिकाने सादर केलेल्या ‘नाद खुळा..’ या लावणीवर रिसकांनी ठेका धरला. यावेळी अध्यक्ष चंद्रकांत सावंत, संयोजक नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे, झुंजार सावंत उपस्थित होते.