मोबाईल कॉल रेट दुपटीने महागले

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. २३ - भारती एअरटेल या देशातल्या अग्रगण्य दूरसंचार कंपनीने मोबाईल कॉलच्या दरात दुपटीने वाढ केली असून अन्य दूरसंचार कंपन्याही अशीच वाढ करण्याची शक्यता आहे. भारतीने प्रति मिनिट एक रुपयांवरुन कॉलरेट दुपटीने वाढवून थेट दोन रुपये केल्याचे वृत्त आहे. मोफत देण्यात येणारा काही मिनिटांचा कालावधीही कमी करण्यात येत असून प्री-पेड कॉल व्हाउचर्सचे दरही १० ते ३० टक्क्यांनी वाढवण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तर आयडिया या दुस-या बड्या कंपनीने काही झोन्समधल्या प्रमोशनल ऑफर्स रद्द केल्या असून परिणामी दरवाढ लागू केली आहे. अर्थात आयडियाने सरसकट दरवाढ केली नसून ठराविक झोन्समध्ये केल्याचे सांगण्यात येत आहे.

आयडियाने प्रति सेकंद १.२ पैसे असलेला दर वाढवून दोन पैसे प्रति सेकंद केल्याचे वृत्त काही वृत्तसंस्थांनी दिले आहे. दूरसंचार क्षेत्रामध्ये मिळणा-या एकूण महसूलामध्ये व्हॉइस कॉल्सच्या महसुलाचा वाटा तब्बल ८५ टक्के आहे. याचा अर्थ या दरवाढीमुळे बहुतेक सर्व ग्राहकांना फटका बसणार आहे आणि त्याचवेळी कंपन्यांच्या उत्पन्नांमध्ये चांगलीच भर पडणार आहे.

भारतामध्ये मोबाईल कॉल रेट हे जागतिक पातळीचा विचार करता अत्यंत कमी असून बड्या कंपन्यांच्या प्राइस वॉरचा फायदा ग्राहकांना मिळत होता. त्यामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये महागाई वाढली परंतु कॉल रेट्स मात्र स्थिर होते. परंतु आता मात्र त्यांच्यातील युद्ध काही प्रमाणात निवळले असून या कंपन्यांनी दरवाढ करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये खर्च वाढत होता, परंतु मोबाईलची भाडी मात्र कमी होत होती, आता हे चित्र अपरीहार्यपणे बदलत असल्याचे मत एका तज्ज्ञाने व्यक्त केले आहे.

सूत्रांच्या सांगण्यानुसार जरी दरांमधली वाढ ठराविक झोन्समध्ये झाली असली तरी ती यथावकाश देशातल्या सगळ्या म्हणजे २२ सर्कल्समध्ये लागू करण्यात येईल. मोबाईल कंपन्या कॉल रेट्समध्ये वाढ करत असल्याच्या वृत्तानंतर शेअर बाजारामध्ये या कंपन्यांच्या शेअर्सना तेजी आली असून आयडिया, भारती, रिलायन्स आदी दूरसंचार कंपन्यांचे शेअर्स ३ ते ४ टक्क्यांनी वधारले आहेत.