युद्धकाळ सरला, आता आर्थिक सुधारणा

वॉशिंग्टन। दि. 22 (वृत्तसंस्था)

अमेरिका आता जागतिक समस्यांच्या फंदात न पडता सामाजिक, राजकीय आणि आर्थिक आव्हानांवर लक्ष केंद्रित करणार आहे, असे आश्वासन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या दुस:या इनिंगची सुरुवात करताना दिले.

अध्यक्षपदी दुस:यांदा निवड झाल्यानंतर ओबामा यांचा सोमवारी शपथविधी झाला. त्यानंतर देशवासीयांना संबोधित करताना ते म्हणाले की, जगातील सर्व आघाडय़ांचा केंद्रबिंदू म्हणून अमेरिका कायम राहील, तसेच जगभरातील समस्यांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता असलेल्या संस्थांचे पुनरुज्जीवन करील.

स्वातंत्र्याची वाट पाहत असलेल्यांसाठी काम करणे हे आमचे कर्तव्य आहे, असे स्पष्ट करून ओबामा म्हणाले की, इतर राष्ट्रांसोबतचे मतभेद शांततेच्या मार्गाने सोडवण्यावर आमचा भर असेल. आम्ही फक्त युद्धच जिंकले

असे नव्हे, तर शांततेवरही विजय मिळवला आहे. कट्टर शत्रूंना आपले

मित्र बनवण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. हाच वारसा यापुढेही टिकवून ठेवला जाईल.

अमेरिकेच्या भवितव्यावरील विश्वास हा ओबामा यांच्या भाषणाचा केंद्रबिंदू होता. ते म्हणाले की, अजूनही आपल्या देशाचा प्रवास पूर्ण झालेला नाही. अमेरिकेच्या भविष्याला कोणत्याही मर्यादा नाहीत.

ओबामा यांनी या 15 मिनिटांच्या भाषणात समलैंगिकांचे हक्क, स्थलांतर, हिंसाचार अशा विविध मुद्दय़ांना स्पर्श केला; मात्र जागतिक दहशतवादाचा उल्लेख त्यात नव्हता.

ओबामा यांच्या शपथविधीनंतर स्वागत समारंभाचे आयोजन

करण्यात आले होते. त्यात भारतीयांची उपस्थिती लक्षणीय होती.

तसेच या वेळी मनोरंजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. अॅलिशिया केज, ब्लॅक व्हायलीन,

ब्रॅड पेजले, फार इस्ट मूव्हमेंट, एफयूएन, ग्ली ही बँड पथके,

तसेच जॉन लिजंड, केटी पेरी, माना,

स्मोकी रॉबिन्सन, साऊंड गार्डन, स्टीव वंडर आणि अशेर या कलावंतांनी आपली कला सादर केली.