राजगुरुनगरचे पळविले पाणी

राजगुरुनगर। दि. १३ (वार्ताहर)

कडूस प्रादेशिक पाणी योजनेचे हस्तांतर रद्द समजण्यात यावे, असे पत्र जीवन प्राधिकरणाने राजगुरुनगर ग्रामपंचायतीस पाठविले असून, या योजनेमुळे अक्षरश: राजगुरुनगरवासियांच्या तोंडाशी आलेले पाणी जीवन प्राधिकरणाने पळविले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

भरमसाठ वीजबिल आणि तांत्रिक दोषांमुळे ३२ कोटींची ही योजना बंद पडली होती. राजगुरूनगरचा जटील पाणीप्रश्न विचारात घेऊन, ही योजना ग्रामपंचायतीकडे देण्याचे साकडे राजगुरूनगरच्या कार्यकारी मंडळाने प्राधिकरणास घातले होते. या योजनेचा हत्ती पोसायचा कोणी, या विवंचनेत असलेल्या प्राधिकरणास यामुळे पर्याय उपलब्ध झाला. ज्या गावांसाठी ही योजना तयार करण्यात आली, त्यांच्याकडून ‘ना हरकत’ व इतर सोपस्कार राजगुरुनगर ग्रामपंचायतीकडून पूर्ण करून घेण्यात आले. या योजनेचे थकीत वीजबिल शासने भरेल, असे आश्‍वासन पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी दिले होते. त्यामुळे ही योजना ग्रामपंचायतीकडे येणार असेच, चित्र निर्माण झाले होते.

अशातच ही योजना ‘सेझ’कडे हस्तांतरीत करण्याच्या हालचालीही सुरू झाल्या. त्याला कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय डोळस यांनी विरोध करत आंदोलन केले. सव्वादोन कोटींचे थकीत वीजबिल भरण्याची तयारी ग्रामपंचायतीने दाखवली. तथापि, हा प्रश्नही अधांतरीच होता. जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी मध्यंतरी ग्रामपंचायतीस भेट दिली. ही योजना महागडी व न परवडणारी आहेै. ती परत करा, अशी भूमिका या अधिकार्‍यांनी घेतली. सरपंच प्रदीप कासवा व त्यांच्या सहकार्‍यांनी त्याला विरोध दर्शविला. सर्व सोपस्कार पार पडल्याने आता ग्रामपंचायतीला पाणी मिळणार, असे चित्र निर्माण झाले असतानाच जीवन प्राधिकरणाने त्यावर आता बोळा फिरविला आहे. या योजनेचे हस्तांतर रद्द समजण्यात यावे, असे पत्र प्राधिकरणाने ग्रामपंचायतीस पाठविले आहे. त्यामुळे तोंडाशी आलेले पाणी प्राधिकरणाने पळविले आहे. यामुळे राजगुरूनगरच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. याबाबत ग्रामपंचायतीने तीव्र सताप व्यक्त केला असून, न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.