राजनाथ सिंग भाजपचे नवे अध्यक्ष

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. २३ - राजनाथ सिंग यांची बुधवारी भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी राजनाथ सिंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर राजनाथ सिंग यांनी अधिकृतरित्या आपला उमेदवारी अर्ज भरला आणि त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मंगळवारी नितिन गडकरी यांनी अचानक आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला. गडकरी यांच्या पूर्ती उद्योगसमुहात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप असल्याने २०१४ साली होणा-या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पुन्हा एकदा अध्यक्ष करणे भाजपला अडचणीचे वाटत होते. त्यामुळे त्यांच्या नावाला पक्षांतर्गत मोठा विरोध होता.

या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंग यांचे नाव पुढे आले. त्यावर बुधवारच्या बैठकीत चर्चा झाली. पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीच राजनाथ यांचे नाव बैठकीत सुचवले. त्याला गडकरींसह सर्वांनी अनुमती दिली आणि पक्षातर्फे राजनाथ यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर राजनाथ सिंग यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला व त्यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवडही झाली.

नवनियुक्त अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी आपल्याला निवडून दिल्याबद्दल सर्व सहका-यांचे आभार मानले. आपण अध्यक्षपदाचा स्वीकार एक पद म्हणून नव्हे तर एक जबाबदारी म्हणून करत असल्याचे त्यांनी म्हटले. ज्या परिस्थितीत मला हे पद स्वीकारावे लागले ती परिस्थिती काही फारशी चांगली नाही. नितिन गडकरी यांच्यासारख्या पक्षाच्या एका सक्षम आणि प्रामाणिक नेत्यावर झालेल्या आरोपांमुळे त्यांनी व्यथित होऊन पदाचा राजीनामा दिला आहे. आपण या आरोपांतून पूर्णपणे निर्दोष सिद्ध होऊन बाहेर येत नाही तोपर्यंत पद स्वीकारणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे माझी निवड झाली. याबद्दल मी पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचे आभार मानतो. देशापुढील भावी काळ आव्हानात्मक आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार महागाई, भ्रष्टाचार, अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा, परराष्ट्रनिती अशा सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. अशा काळात देशाचे नागरिक भाजपकडे आशेने पाहत आहेत. २०१४ साली होणा-या निवडणुकीत भाजपचेच सरकार बनेल, असा मी सर्वांना विश्वास देऊ ईच्छितो, असे राजनाथ सिंग म्हणाले. तसेच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाजप व संघ परिवारावर जे दहशतवाद फैलावण्याचे आरोप केले आहेत ते बेजबाबदार व गंभीर असून त्याविरुद्ध पक्ष गुरुवारपासून आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले.

अडवाणी आणि गडकरी यांनीही राजनाथ सिंग यांचे अभिनंदन करत त्यांना चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. अडवाणी यांनी राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली भाजप उत्तर प्रदेश आणि देशात अन्यत्र आपली स्थिती अधिक मजबूत करेल, अशा विश्वास व्यक्त केला. तसेच गडकरी यांच्या कामगिरीचेही कौतुक केले. त्यांच्यावर आरोप झाले असले तरी गडकरी यांचे भाजपमधील योगदान आणि त्यांची पक्षाप्रति समर्पित वृत्ती वादातीत असल्याचे अडवाणींनी म्हटले.