रुचिरा नाचणीचं पुडींग

ऑईल फ्री पाककृती विशेष भाग २

१) नाचणीच पुडींग

साहित्य- २ वाटी नाचणी, १ वाटी किसलेला गुळ, १ वाटी ओल्या नारळाचा चव, १ वाटी नारळाचं घट्ट दूध, वेलची पूड, ड्रायफ्रुट्सचे काप

कृती - नाचणीचं सत्व गव्हाच्या सत्वाप्रमाणं तयार करुन घ्यावं. नाजणीच्या सत्वात अर्धीवाटी पाणी घालून ते जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईत टाकून परतावं, मिश्रण चांगल जाडसर होत आल्यावर त्यात गूळ,नारळाचं दूध, नारळाचा चव आणि वेलचीपूड घालावी. मिश्रण चांगलं ढवळावं. झाकण ठेवून पाच मिनिट चांगली वाफ आणावी . नंतर ताटात पसरवून त्याच्या वड्या पाडाव्यात किंवा बाऊलमध्ये घालून त्यावर सुकामेवा टाकावा.

२) छोले पुलाव

साहित्य - १ वाटी शिजवलेले काबुली चणे, २ वाटी बासमती तांदूळ, मीठ, १ टे स्पू धणे, १ टेस्पू जिरे, २ टे. स्पू. चारोळी, २ टे-स्पू दही, १ टे. स्पू. लिंबाचा रस, १ टी स्पू. शहाजिरे, २ मध्यम आकाराचे कांदे.

कृती - तांदूळ धुवून निथळून ठेवावेत. कांदे गॅसवर भाजून बारीक चिरावेत. लवंग, दालचिनी, खसखस, जिरे, धने कोरडे भाजून त्याची पूड करावी, बारीक चिरलेले कांदे शिजलेले काबुली चणे, मीठ आणि मसाला पूड एकत्र करुन ते पाच मिनिट ंपरतावे नंतर दही घालून आणखी २ मिनिटं परतावे. ४ वाट्या पाण्यात तांदूळ घालून त्यात मीठ व शहाजिरे टाकावे.भात अर्धा शिजला की पाणी चाळणीतून निथळून घ्यावं. भातात लिंबाचा रस घालून त्यावर झाकण ठेवावं, भाताचे दोन भाग करावे. जाड बुडाच्या पातेल्यात भाताचा एक भाग पसरवून त्यावर चण्याचं मिश्रण पसरुन टाकावं . वर भाताचा दुसरा भाग पसरवून त्यावर चारोळी टाकून झाकण ठेवावं. मंद गॅसवर पुलावाला चांगली वाफ येवू द्यावी.

३) नारळाची कढी

साहित्य - १ वाटी ओल्या नारळाचा चव, १ टे. स्पू तांदूळ, २ हिरव्या मिरच्या, जिरे, २ टी स्पू. आलं पेस्ट, २ लसूण पाकळ्या, कढी पत्त्याची पान, मीठ,२ टे. स्पू. दही, १ टी. स्पू. साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती - तांदूळ भिजत घालावेत .हिरव्या मिरच्या-लसूण-तांदूळ,जिरे,नारळाचा चव,दही मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावं. नॉनस्टिक पॅनमध्ये कढीपत्त्याची पानं कोरडी भाजून घ्यावीत. चांगली खरपूस भाजल्यावर त्यावर वाटलेलं मिश्रण ओतावं .त्यात मीठ,आलं पेस्ट,साखर आणि आवडीनुसार पाणी टाकावं, हे मिश्रण सतत ढवळावं. उकळी आली की गॅस बंद करावा. कोथिंबीर टाकून गरमागरम कढी खाण्यास द्यावी.

४) सँडविच ढोकळा

साहित्य - १ वाटी उकडा तांदूळ, १ वाटी हरभरा डाळ, अर्धा वाटी उडीद डाळ, ३-४ हिरव्या मिरच्या, मीठ, १ वाटी हिरवी चटणी, कोथिंबीर , १/२ वाटी दही, १/२ टी. स्पू. खायचा सोडा, नारळाचा चव

कृती - हरभरा डाळ, तांदूळ, उडीद डाळ वेगवेगळी भिजवून ठेवावी. ८-१0 तास भिजल्यावर उपसून वेगवेगळी वाटून घ्यावी. हरभरा डाळ वाटतांना त्यात हिरव्या-मिरच्या, मीठ व दही टाकावं. वाटलेल मिश्रण तीन तास झाकून ठेवावं, हरभरा डाळीच्या मिश्रणात थोडा सोडा घालावा, हे मिश्रण भांड्यात घालून वाफवाव. थंड झाल्यावर त्यावर हिरवी चटणी पसरुन टाकावी. नंतर तांदळाच्या मिश्रणात सोडा घालून तांदळाचं मिश्रण त्यावर पसरुन टाकावं. आणि परत १0 मिनिटं मंद आचेवर शिजवावं. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. वरुन चिरलेली कोथिंबीर आणि नारळाचा चव घालावा.

५) भाज्यांची भेळ

साहित्य - अर्धी वाटी शिजवलेले काबुली चणे, मोडाचे मूग १ वाटी, कांदा, १ टोमॅटो, १ गाजर, १ काकडी, १ शिमला मिरची, चिंचेची चटणी, टॉमेटो सॉस, मीठ, १ वाटी वाफवलेल्या नूडल्स ४-५ टोस्ट, कोथिंबीर, १ हिरवी मिरची बारीक चिरलेली.

कृती - कांदे,टोमॅटो,गाजर-काकडी-शिमला मिरची बारीक कापून घ्यावी. टोस्टचे लहान तुकडे करावे. एका बाऊलमध्ये सर्व भाज्या-नुडल्स-चणे-मूग टाकून त्यात आवडीप्रमाणे चिंचेची चटणी,टॉमेटो सॉस, मीठ,हिरव्या मिरच्या घालाव्यात. शेवटी वाढताना त्यावर टोस्टचे तुकडे आणि कोथिंबीर टाकावी.

६) मिक्स पिठाची भाकरी

साहित्य - गहू , ज्वारी, सोया बाजरी, नाचणी, हिरवे मूग, उडीद, मसूर, मटकी, मीठ

कृती - गहू १ किलो बाकी सर्व धान्य २५0 ग्रा. या प्रमाणात घेवून ते एकत्र करुन बारीक दळून आणावं . पिठात थोडं मीठ घालून पाण्यात मऊसर भिजवावं. भिजवलेल्या पिठाची किंचित जाडसर पोळी लाटून लोखंडी तव्यावर चांगली शेकून गरमा गरम खायला द्यावी, लसणाच्या पातीचा ठेचा किंवा पिठल्या बरोबर ही मिक्स पिढाची भाकरी छान लागते.

७) राजमा

साहित्य - १ वाटी राजमा, १ टे. स्पू. आल लसून पेस्ट, १ टे. स्पू. हिरवी मिरची पेस्ट, १ टी. स्पू. गरम मसाला, १ टी. स्पू. जिरं पूड, हिंग, मीठ, आमचूर पावडर, किसलेलं आलं १ टी. स्पू. बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिलेला कांदा

कृती - राजमा ८-१0 तास भिजत टाकावा, कुकरमध्ये राजमा लसूण पेस्ट, हिरवी मिर्ची पेस्ट, मीठ, हिंग, २ वाटी पाणी घालून मऊ होईपर्यंंत शिजवावा. आमचूर पावडर, गरम मसाला, जिरंपूड घालून, परत गॅसवर कोरड होईपर्यंंत परतून घ्यावा. राजमा वाढतांना वर चिरलेले टॉमेटो-कांदा-कोथिंबीर टाकावी.

- राजश्री शिन्दोरे