रेडमुनिया

अरण्यात- बैजू पाटील

आज इथे दिलेले फोटो हे ‘रेडमुनिया’नामक चिमणीसारख्या पक्ष्याचे आहेत. रेडमुनिया या पक्ष्याचे मराठीत काय नाव आहे ते मला माहिती नाही. परंतु भारतभर सर्वत्र आढळणारा हा पक्षी मी चित्रित केलाय तो कापगावटोका या ठिकाणच्या शिवारात. कापगावटोका येथे नाशिककडून येणारी गोदावरी नदी आणि नगर जिल्ह्यातून वाहत येणारी प्रवरा नदी या दोन नद्यांचा संगम आहे. तिथून पुढे काही किलोमीटर्सवर या नद्यांना बांध घालून उभारलेले प्रख्यात जायकवाडी धरण आहे. त्या जलाशयाचा हा शेपटाकडचा भाग नेहमीच भरपूर पाण्याने तुडुंब भरलेला असतो. परंतु यंदा पाऊस फारच कमी पडला. त्यात पुन्हा वरच्या अंगाला असलेल्या नाशिक-नगर जिल्ह्यांतील धरणांमधून पाणी न सोडल्याने कापगावटोक्याला यंदा एखाद्या गटाराएवढेच पाणी राहिले आहे. एरवी गोदा-प्रवरेच्या या संगमस्थळी फार मोठा पाणपसारा असतो. दोन्ही काठांवर मुक्तेश्‍वर, रामेश्‍वर अशी महादेवाची खूप जुनी देवळे आहेत. एरवी या पाणपसार्‍यामुळे देवळे, घाट यामुळे बहरलेला हा सगळा परिसर यंदा कमालीचा दिनवाणा, बापुडवाणा दिसतो आहे. या संगमावर लोक अस्थिविसर्जन व अंत्यकर्मासाठी येत असतात. ती घाण मात्र आता पाणीच नसल्याने उघड्यावर आली आहे. हा परिसर विविध प्रकारच्या छोट्या-मोठय़ा पक्षीसृष्टीने खूप समृद्ध आहे. पक्ष्यांच्या फोटोग्राफीसाठी इथे खूप मोठा खजिना आहे. या संपूर्ण परिसरातील शेतजमिनीही गोदा-प्रवरेच्या गाळाची जमीन आहे. सुपीक जमीन आहे. त्यामुळे शेतशिवार नेहमीच फुललेले आणि हिरवेगार असते. त्यामुळे पक्षीही मोठय़ा संख्येने असतात. रेडमुनियाचे फोटो मी तिथेच टिपलेले आहेत.

पैकी एका ओळीत झाडाच्या फांदीवर जे चार पक्षी आहेत, त्या माद्या आहेत. रेडमुनियाच्या माद्या नावाप्रमाणे भरपूर लालरंगाच्या नसतात. त्यांच्या चोचीचा रंग लालसर असतो आणि डोळेही लाल रंगाचे असतात. खालच्या फांदीवर बसलेला जो एकच पक्षी आहे, तो नर रेडमुनिया आहे. नराचा एक मोठा स्वतंत्र फोटोही दिला आहे. त्यावरून नराचा रंग लालतांबडा असतो. त्यावर पांढरे ठिपके असतात. चोचही लाल असते. डोळेही लाल असतात, हे लक्षात येते. नराचा आकारही माद्यापेक्षा काहीसा मोठा असतो. पायही फिकट लालसर रंगाचे असतात. आकाराने हा पक्षी सरासरी दहा सेंटिमीटर एवढा असतो. रेडमुनिया पक्ष्याची रंगसंगती अशी असते की, जणू कुणीतरी त्यांना घाईघाईत हाताने रंग दिला आहे, असे वाटते. सुगीच्या हंगामात हिरव्याकंच शेतशिवारातून लाल रंगाचे नर रेडमुनिया पक्षी एकदम उठून दिसतात. पण त्यांचे थवे कधीच एका जागी स्थिर आणि दीर्घकाळ बसत नाहीत. भुर्रकन उडून जातात. आत्ता शेतात थवा होता, आता उडून रस्त्यावरच्या तारेवर जाऊन बसलाय असे फार होते. त्यामुळेच फोटोग्राफीसाठी हा चंचल पक्षी अवघड आहे. दुर्बिणीतून अगोदर रेडमुनियाचे थवे कुठे आहेत, ते लोकेट करावे लागते. याच्या फोटोग्राफीसाठी मोठय़ा भिंगांची गरज असते. साध्या भिंगांनी त्यांचे रंगसौंदर्य आणि देहसौंदर्याचे बारकावे नीट टिपता येत नाहीत.

रेडमुनियास इंग्रजीत ‘रेडअँवडवट’ असे म्हणतात. शास्त्रीय नाव आहे अेंल्ल५िं ेंल्ल५िं. त्यांच्या अनेक उपजातीही असतात. काहींचा रंग हिरवा अधिक असतो. त्यांना ‘ग्रीन अँवडवट’ असे म्हणतात. विविध पिकांचे दाणे हे त्यांचे मुख्य अन्न. याशिवाय सर्व प्रकारच्या अळ्या, किडी, किडेमकोडे हेही रेडमुनिया खाते. अन्य अनेक पक्ष्यांप्रमाणे रेडमुनियामध्येसुद्धा मादीपेक्षा नर पक्षी आकाराने थोडा मोठा आणि दिसण्यात अधिक भरदार, रुबाबदार असतो.

वन्यजीव छायाचित्रणात माझा कटाक्ष नेहमी प्रत्येक प्राणिमात्रातील नर आणि मादी या दोघांचेही स्वतंत्र फोटो काढण्यावर असतो. बहुतेक वेळा ते जमतेच. पण कधी कधी मात्र नुसतेच नर दिसतात किंवा नुसत्याच माद्या दिसतात. अशावेळी शांतपणे, संयम राखत त्यांना लोकेट करावे लागते. वन्यजीव छायाचित्रण मला नेहमीच आनंद देते. त्यामुळे तहानभूक हरपून मी या कामात रमलेला असतो. पक्षीसृष्टी, प्राणिसृष्टी आणि एकूणच निसर्गात पाहण्यासारखा अपरंपार खजिना विखरून पडलेला आहे. निसर्गाला, पर्यावरणाला धक्का न लावता, त्याची हानी न करता चिवटपणे मी अधिकाधिक सामग्री माझ्या कॅमेर्‍यात बंदिस्त करतो आहे. वर्षानुवर्षे.

शब्दांकन : सुधीर सेवेकर

manthan@lokmat.com