रेडिओ जॉकींमुळेच आत्महत्या

लंडन। दि.१६ (वृत्तसंस्था)

ऑस्ट्रेलियाच्या रेडिओ जॉकींनी राजघराण्यातील व्यक्ती असल्याचे भासवून फोनवरून आपल्याकडून माहिती काढून घेतली. या रेडिओ जॉकींमुळेच आपल्याला आत्महत्या करावी लागत आहे, असे भारतीय वंशाची नर्स जसिंथा सलढाणा हिने मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिले आहे. प्रिन्स विल्यम्सची पत्नी केट मिडलटन हिच्या गरोदरपणाविषयीची माहिती उघड केल्याप्रकरणी तिने आत्महत्या केली होती.

जसिंथा हिने मृत्युपूर्वी तीन चिठ्ठय़ा लिहून ठेवल्या आहेत; त्यातील एका चिठ्ठीत तिने आपल्या आत्महत्येला ऑस्ट्रेलियन रेडिओ जॉकी मेल ग्रेग आणि मायकेल क्रिस्टन जबाबदार असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. ब्रिटनमधील आघाडीचे दैनिक डेली मेलने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. ४६ वर्षीय जसिंथाने लिहिलेल्या या चिठ्ठय़ा आता स्कॉटलँड यार्ड पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्या प्रती पोलिसांनी जॅसिंथाच्या कुटुंबियांना दिल्या आहेत.

लंडनमधील किंग एडवर्ड सातवे हॉस्पिटलच्या निवासी वसाहतीत जसिंथाचा मृतदेह आढळून आला होता. तिने आपल्या राहत्या क्वार्टरमध्ये ओढणीने फास घेऊन आत्महत्या केली होती. या रुग्णालयात केट मिडलटन हिच्यावर उपचार सुरू होते. तिच्याविषयीची माहिती मिळविण्यासाठी ग्रेग आणि क्रिस्टन यांनी महाराणी एलिझाबेथ आणि प्रिन्स चार्ल्स यांचे आवाज काढून जॅसिंथाला फोन केला होता. राजघराण्यातील व्यक्तींशी बोलत आहोत, असे समजून जसिंथाने त्यांना केटच्या गर्भारपणाशी संबंधित सर्व माहिती त्यांना दिली होती.