रेशिमबंध - विलक्षण

- सतीश पाकणीकर

सवाई गंधर्व महोत्सवाकडे मी न कळत वळलो. दहावीत असताना मित्राच्या घरी रहायला गेलेलो. घराजवळच काहीतरी सुरू आहे म्हणून सहज रेणुका स्वरूप शाळेकडे डोकावलो आणि त्या संगीताकडे खेचलो गेलो. त्यावेळी पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचे बासरीवादन सुरू होते. कळत काहीच नव्हते; पण कोणत्यातरी वेगळ्याच जगात गेल्यासारखे वाटले. नंतर दुसर्‍या व तिसर्‍या दिवशी संपूर्ण रात्रभर बसून पहाटेपर्यंत हा महोत्सव ऐकला. त्यानंतर मात्र पुढच्या वर्षीपासून नियमित श्रोता झालो.

आम्ही काही मित्र ठरवून सवाईला येण्याचे बेत आखत. मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने संपूर्ण महोत्सवाचे तिकीट काढणे शक्य नसे. मात्र तरीही ‘मॅनेज’ करून आम्ही मित्र महोत्सवाला जात असू. फोटोग्राफीची आवड होती. माझ्या या आवडीला दिशा सवाई महोत्सवाने दिली. १९७७ ते १९८२ पर्यंत मी प्रेक्षकांच्या शेवटच्या ओळीतून फक्त महोत्सव ऐकत असे. १९८३ मध्ये माझ्या हातात कॅमेरा आला आणि त्या कॅमेर्‍यानेच मला महोत्सवाच्या, कलाकारांच्या आणि पंडितजींच्या जवळ नेले. खिशात भारतीय बैठकीचे तिकीट होते. परंतु गळ्यात कॅमेरा लटकविलेला बघून मला कोणी अडविले नाही. पहिल्यांदा भीतभीतच सहज ग्रीन रूमकडे वळलो. त्यावेळी शिवजी व आरती अंकलीकर तेथे बसलेले होते. त्यांचे फोटो काढले. आजूबाजूचे स्वयंसेवकही पुढे येऊन त्यांच्यासोबत फोटो काढण्यास सांगू लागले. त्यावेळी मी स्वरमंचावरील भावमुद्रांबरोबरच ग्रीन रूममधील घडामोडी टिपण्यात अधिक उत्सुक होतो. त्यामुळे दुर्मिळ व वेगळ्या कलावंतांच्या भावमुद्रा टिपता आल्या. अशाप्रकारे माझ्याकडे १९८५ पर्यंत ५0 मुख्य कलाकारांची छायाचित्रे जमलेली होती. सवाईबरोबरच अन्य ठिकाणचे संगीत महोत्सव करून ही छायाचित्रे मी जमविली होती. एकदा ते मित्राला दाखवत असताना त्याने प्रदर्शन भरविण्याची कल्पना सुचविली. मग जून ८६ मध्ये पहिले प्रदर्शन भरविले. छायाचित्रांच्या निमित्ताने प्रत्यक्ष कलावंतांशी ओळख झाली. मग सवाई म्हटले की, बाकीचे सर्व कामे बाजूला ठेवायचे आणि केवळ सवाई महोत्सवात फोटो काढायचे, असा नेमच झाला. त्यासाठी मुंबईला जाऊन १00 फुटी रोल आणत असे. या फोटोंचे महत्त्व नंतर नंतर लक्षात येऊ लागले तेव्हा जाणवले की, रंगीत फोटोंचे रंग कालांतराने फिकट होतात. जर याचे डॉक्युमेंटेशन करायचे असेल तर ब्लॅक अँन्ड व्हाईट फोटो काढायला हवे. त्या छायाचित्रांच्या प्रदर्शनांमुळे त्यात नेमके कोण कोण कलाकार आहेत हे विचारण्याच्या निमित्ताने पंडितजींकडेही जाणे-येणे वाढले. पंडितजी गायला बसले की, वेगळ्याच जगात असायचे. मग कोणी कितीही जवळून किंवा फ्लॅश मारून फोटो काढला तरी त्यांना अजिबात फरक पडत नसे. महोत्सवात त्यांच्या गाण्याआधी ते ग्रीन रूममध्ये रियाज करत. तो क्षण दहा मैफलींमध्येही मिळणार नाही, असा असायचा.

कालांतराने त्या त्या वर्षाचे वैशिष्ट्य ओळखून प्रदर्शनासाठी थीम ठरू लागली. एखाद्या व्यक्तीला सर्मपित प्रदर्शन होऊ लागले. त्यामुळे कलाकारांच्या जवळ जाता आले. त्यावेळचे कलाकार अत्यंत साधे होते. महोत्सवाच्या आणि कलाकारांच्या साधेपणात महोत्सव खूपच आकर्षक होत असे. आज महोत्सव अधिक हायटेक होत आहे. २00५ पासून पंडितजींची तब्येत खालावू लागली तसा त्यांचा प्रत्यक्ष सहभाग कमी झाला. महोत्सवाचे स्वरूप बदलू लागले. मैफलींना पूरक असे विविध उपक्रम सुरू झाले. यामुळे महोत्सवाला मोठे स्वरूप प्राप्त होत गेले. महोत्सवात दर्दी लोकांबरोबरच संगीताची जाण नसणारेही खेचले जात आहेत. हे खरेतर महोत्सवाचेच यश आहे. शास्त्रीय संगीत फक्त ‘क्लास’साठी आहे, ‘मास’साठी नाही, ही बूज या महोत्सवाने काढून टाकली.

शब्दांकन - धनश्री भावसार