लॉबिंग

- दीपक करंजीकर

सध्या आपल्या देशात वॉलमार्टने केलेल्या लॉबिंगवरून मोठा गोंधळ माजला आहे. राजकीय पक्षातील मुरब्बी नेतेसुद्धा याबद्दल एकदम नवीनच काहीतरी सापडले, असे बोलत आहेत. जणू त्यांनी आयुष्यात प्रथमच ही गोष्ट ऐकली, पाहिली अथवा अनुभवली आहे.

वास्तविक वॉलमार्ट जगातील सगळ्यात मोठा रिटेल जायंट. भारताच्या महाकाय अशा (सुमारे ५00 अब्ज डॉलर्स) ग्राहक रिटेल मार्केटमध्ये त्याला काहीही करून शिरकाव करायचा होता. त्यासाठी अमेरिकन कायदे करणार्‍या काँग्रेस सदस्यांबरोबर या कंपनीचे २00८पासून जोरदार लॉबिंग चालले होते. वॉलमार्टने अमेरिकन सिनेटला सदर केलेल्या डिस्क्लोजर रिपोर्टप्रमाणे वॉलमार्टने यासाठी सुमारे २५ मिलियन डॉलर्स (१२५ कोटी रुपये) खर्च केल्याचे सांगितले आहे. वॉलमार्ट या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर ४४0 अब्ज डॉलर्स इतका प्रचंड आहे. या दृष्टीने ही रक्कम अगदीच मामुली अशी आहे. भारताचे ५00 अब्ज डॉलर्सचे रिटेल मार्केट जे बरेचसे असंघटित आहे, ते २0२0 पर्यंत १ ट्रिलीयन डॉलर्स इतके विस्तारण्याची शक्यता आहे. हे सर्व आकडे बघता वॉलमार्टसाठी लॉबिंग करणे हा अत्यंत निकडीचा विषय असू शकतो. इकडे आपण काहीही बोंबाबोंब करीत असलो आणि या भ्रष्टाचाराने असह्य धक्का बसला, असे दांभिकपणे दाखवीत असलो तरी अमेरिकेने मात्र यावर आपली कंपनी वॉलमार्टने काही चूक केली नसल्याचे ठणकावले आहे. अमेरिकन प्रवक्त्याने जाहीरपणे सांगितले, ‘यामध्ये काहीही बेकायदेशीर आहे, असे आम्हाला वाटत नाही. आमच्या सरकारच्या कोणत्याही कायद्याचे काहीही उल्लंघन झालेले नाही.’ भारतीय संसद याबद्दल काही का ठराव करेना अमेरिकन सरकारच्या या भूमिकेने या विषयाचे पुढे काहीही होणार नाही. कारण लॉबिंग ही सर्वमान्य पद्धत आहे. ही चौकशी करू, असे जाहीर करणार्‍या कमलनाथ यांनाही हे माहीत आहे आणि त्याच्या चौकशीची मागणी करणारे रवी प्रसाद, येचुरी, मुलायम, माया, वर्धन, राजा या सगळ्यांनाही हे नवीन नाही. जिथे हे घडले त्या देशाला याबद्दल काही आक्षेप नाही. त्या कंपनीने हे स्वत: जाहीर केले आहे आणि ‘बेगानी शादीमें अब्दुल्ला दिवाना’ तसे आपले राजकीय पक्ष इकडे शिमगा करतात. यातून फक्त आपण बावळट असल्याची दिंडी जगभर पिटली जाईल.

भारतात लॉबिंग अधिकृत का अनधिकृत याचे कोणतेही कायदे नाहीत. त्यामुळे कोणाला काय शिक्षा करणार, कशाच्या आधारे? हा सगळा सावळा गोंधळ बाजूला ठेवून लॉबिंग मुळात आहे काय हे समजावून घेणे गरजेचे आहे. ते कोण कशासाठी करते त्याविरुद्ध अमेरिकन सरकार अशी भूमिका का घेते? लॉबिंग ही काही अचानक आकाशातून पडलेली गोष्ट नाही. तिचा वावर आणि व्याप मोठा आहे. आज जगभर लॉबिंग हे नफापिपासू कॉर्पोरेशन आणि अर्मयाद संपत्तीचा हव्यास याच्याशी सातत्याने निगडित आहे.

अमेरिकेत हे वर्षानुवर्षे सुरू आहे. जगातल्या सर्व शक्तिमान अशा लोकशाहीच्या राजधानीत म्हणजे वॉशिंग्टन डीसीमध्ये एकाच वेळी किमान १३000 लॉबिस्ट कार्यरत असतात. काय करतात इतकी माणसे? - हे म्हणजे एखाद्या मोठय़ा उद्योगसमूहासारखे आहे. लॉबिंगचे एक अंगभूत वैशिष्ट्य आहे ते म्हणजे चिवटपणा. एखादे काम करून घेण्यासाठी कोणतीही लाज, तमा, भीड न बाळगता कोणत्याही थराला जाण्याची वृत्ती हे लॉबिस्टचे प्रमुख क्वॉलिफिकेशन. गेल्या चार दशकांत अनेक मॅनेजमेंट कन्सल्टिंग फर्म्स जन्माला आल्या. कारण ते लॉबिंगचे अजून एक टोपणनाव आहे. लॉबिंग ही सरकारची धोरणे आपल्या बाजूने वळविण्यासाठी पाठपुरावा करणारी आणि त्यासाठी पैशाचे हत्यार वापरणारी एक थेट व्यवहारी नित्यव्यवस्था आहे. मला फायदा व्हावा यासाठी मी जे काही करतो आणि ज्याला कायद्याने वैधता आहे, अशी ही चौकट आहे. तुम्ही लॉबिंगवर जो पैसा खर्च कराल त्यात पारदश्रीपणा आणला की झाले. म्हणजे एखादी अमेरिकन कंपनी जर लॉबिंग करीत असेल त्यासाठी किती पैसे खर्च केले हे तिने सिनेटला सांगायचे. ‘डिस्क्लोजर रिपोर्ट’ नावाच्या एका कागदपत्रात याचा उल्लेख करणे अनिवार्य आहे. लॉबिंगचा जो हा कायदा अमेरिकेत आहे त्याद्वारे जे लॉबिंग केले जाते त्याबद्दल उघडपणे सांगावे. कोणी, कोणाला, किती आणि कशासाठी लॉबिंग केले याची माहिती देणे त्या कायद्याने बंधनकारक आहे. एकदा विविध आमिषे वापरून ही व्यवस्था अशी पारदश्री झाल्यावर मग मोठाल्या अमेरिकन कॉर्पाेरेशनने आपल्या पदरी केवळ या कामासाठी अनेक व्यावसायिक माणसे अथवा फर्म्सच ठेवल्या. मग ती आपल्या क्लायंटचे हितसंबंध जपतात. आता ही माणसे पैशाच्या आणि इतर आमिषाच्या बदल्यात आपल्या क्लायंटचे हित जपण्यासाठी कामाला लागली. लोकशाहीच्या न्यायमार्गाने वेगवेगळे कायदे, बिले त्या देशांच्या वैधानिक मंडळात (सिनेट संसद पोलिट ब्युरो) मंजूर करून घेतात. गफलत होते ती इथे की एजन्सीजचा पारदश्रीपणा फक्त पैशाच्या बाबतीत आहे. पण त्यांच्यावर या कायद्याच्या नैतिकतेची आणि जनहितासाठीच्या आग्रहाची जबाबदारी नाही. त्यामुळे त्यांना यासाठी आवश्यक ते सर्व मार्ग आणि नीती अवलंबिण्याची मुभा आहे. जनहित बघायचे ते लोकप्रतिनिधींनी आणि प्रसंगी त्यांनाही देणग्या वगैरे देऊन जनहिताविरुद्ध तयार करायचे ते या एजंट्सनी. म्हणजे काय तर त्यांनी ही सर्वमान्य पद्धती करून टाकली आहे. गंमत बघा, सारे जग मुक्त अर्थव्यवस्थेचे नगारे पिटते आहे. आपण असे समजतो की आपण मुक्त स्पर्धेच्या जगात वावरतो, जागतिकीकरण, उदारीकरण यांनी सगळ्यांना समान संधी दिली आहे, असे गोडवे गाणारे गल्लोगल्ली फिरत असतात. या समानतेच्या तथाकथित काळात काही मात्र जास्त समान आहेत हे लॉबिंगने सिद्ध होते. त्यांनी इतरांपेक्षा अधिक समान राहावे अशी व्यवस्था उपलब्ध आहे हे काय नीतिमत्तेच्या गोष्टी करणार्‍या लोकांच्या लक्षात येत नसेल? विविध देशांतील मग ते लोकशाही, ठोकशाही, हुकूमशाही किंवा राजेशाही कोणतेही सरकार असो, विविध पातळ्यांवर लॉबिंग नित्य घडत असते. आजमितीला जगात असा एकही देश नाही, ज्याचे राज्यकर्ते याला बळी पडलेले नाहीत. जे स्वतंत्र, स्वायत्त असल्याच्या घोषणा करतात, अस्मितेचे टेंभे स्वमिरवतात त्यांचे पाय तर अधिकच खोलात आहेत. ते जवळपास मोठाल्या कंपन्यांचे गुलाम झाले आहेत. थोडक्यात, लॉबिंग ही कोणत्याही न्याय्य विकास व्यवस्थेची थट्टा उडविणारी अजून एक व्यापारपद्धतीच झाली. जागतिकीकरणाने वेग पकडल्यावर मोठाल्या बहुराष्ट्रीय कंपन्या, कॉर्पोरेशन्स यांनी लॉबिंगला नफा निर्माण करणार्‍या बेबंद विक्री पद्धतीचे अधिकृत स्वरूप देऊन टाकले आहे.

पूर्वी भारतात अनेक राजकीय प्रतिनिधी हे लोकनेते असायचे. आता वानगीदाखल सध्याच्या सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांकडे एक नजर टाका. ते सर्व एकतर वकील अथवा उद्योगपती आहेत. असे का आणि कसे झाले? याचे इंगित काय असेल? हे राजकीय पक्षातले लॉबिस्ट तर नाहीत?

अमेरिकेत उमेदवारांना देणग्या देणे, काँग्रेसला लॉबी करणे यासाठी अनेक कंपन्यांचे लक्षावधी डॉलर्सचे बजेट असते. वॉशिंग्टनच्या देखण्या आणि हायप्रोफाईल परिसरात, एक ‘के स्ट्रीट’ नावाचा रस्ता आहे. हा रस्ता मला नेहमीच असल्या लोकांनी गजबजलेला दिसला आहे. करकरीत लिमोझिन्स त्यातून लगबगीने उतरणारी माणसे, त्यांचे काळे कोट, उंची डार्क गॉगल्स, हातातल्या देखण्या अँटॅची यांची रेलचेल त्या रस्त्यावर पाहायला मिळते. त्या रस्त्यावर अमेरिकेतल्या अनेक लॉबिंग फर्मस्ना आपले ऑफिस असणे अत्यंत प्रतिष्ठेचे वाटते. तो रस्ता त्यासाठीच (कु) प्रसिद्ध आहे.

प्रत्येकाला आपला माल विकायचा नफा मिळवायचा हक्क आहे, यावर दुमत होऊ शकत नाही. पण हा व्यवसाय गोरखधंदा होऊन, त्याने सरळपणे धंदा करण्याचा हा न्याय्य मार्ग दुसर्‍याला उपलब्ध ठेवू नये यासाठी लॉबिंग करावे या वस्तुस्थितीचे सर्मथन कसे करणार?


लॉबिंगमध्ये अधिकृतरित्या गुंतलेला पैसा

वर्ष रक्कम (अब्ज डॉलर्स) फर्म्सची संख्या

१९९८ १.४४ १0,४0८

१९९९ १.४४ १२,९३६

२000 १.५६ १२,५३६

२00१ १.५४ ११,८३२

२00२ १.८२ १२,११९

२00३ २.0४ १२,९१६

२00४ २.१८ १३,१६७

२00५ २,४२ १४,0७२

२00६ २.६१ १४,५0७

२00७ २.८५ १४,८४८

२00८ ३.३0 १४,२२५

२00९ ३.५0 १३,८0४

२0१0 ३.५२ १२,९७६

२0११ ३.३३ १२,७१९