लोककलेच्या माध्यमातून प्रबोधन

घोटी। दि. १२ (वार्ताहर)

लोककला ही राज्याची सांस्कृतिक ओळख असून, लोककलेतील शाहिरी व पोवाडे हे अनेक चळवळीत प्रबोधन करणारे ठरले आहेत. लोककलेची ही परंपरा अजूनही जिवंत ठेवली असली तरी लोककलेच्या माध्यमातून प्रबोधन व जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी लोककलावंतानी आपल्या कलेच्या माध्यमातून समाजात पसरलेली अंधश्रद्धा, वाढती लोकसंख्या नियंत्रण, अन्याय अत्याचार याविरुद्ध लढा दिला पाहिजे, असे प्रतिपादन नायब तहसीलदार जितेंद्र केदारे यांनी केले.

नेहरू युवा केंद्र व अखिल भारतीय मराठी शाहिरी परिषदेच्या वतीने घोटी येथे जागर लोककलेचा या सांस्कृतिक महोत्सव आज घोटीतील राजाराम साळवी सभागृहात संपन्न झाला. यावेळी अध्यक्षीय भाषणात नायब तहसीलदार केदारे यांनी लोककलेतून समाज प्रबोधन विषद केले. महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती सौ. अलका जाधव यांच्या हस्ते झाले.

यावेळी नेहरू युवा केंद्राचे भास्कर कोल्हे शाहिरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष शाहीर दत्ता वाघ, गणपत जाधव, नवीन शेजवळ, नारायण ठोंबरे, अशोक मुनोत, संजय जाधव, शाहीर एकनाथ गोर्‍हे शाहीर बाळासाहेब भगत बाळासाहेब पलटणे आदि मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी शाहीर शिवनाथ मराडे यांच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने या महोत्सवाची सुरु वात झाली. लक्ष्मण काजळे यांच्या शास्त्रीय भजनाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. या महोत्सवात पारंपरिक गोंधळी, भारूड, वाजंत्री, कामड नृत्य, वाघ्या मुरळी, संगीत भजन, शाहिरी, लावणी व पोलिओ मुक्तीबाबत कलाकारणी आपली कला सदर करून मंत्नमुग्ध केले. महोत्सव यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे शाहीर बाळासाहेब भगत, बाळासाहेब पलटणे, उत्तम गायकर देवीदास साळवे आदिंनी विशेष सहकार्य केले.