‘वंडर्स पार्क’चे शुल्क कमी करा

नवी मुंबई। दि. १६ (प्रतिनिधी)

नेरूळमध्ये उभारण्यात आलेले वंडर्स पार्क हे सर्व नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. मात्र यासाठी आकारण्यात येणारे शुल्क हे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नसल्याने ते कमी करावे, अशी मागणी शिवसेनेने आयुक्तांकडे केली आहे.

जगातील सात आश्‍चर्यांची प्रतिकृती, आकाशपाळणे, ट्रॉय ट्रेन अशा विविध आकर्षणामुळे या वंडर्स पार्कच्या उद्घाटनाची प्रतीक्षा नवी मुंबईकर करीत होते. शनिवारी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या पार्कचे लोकार्पण करण्यात आले. या पार्कमध्ये प्रवेशासाठी प्रौढांसाठी ३५ रुपये, मुलांसाठी २५ रुपये, शैक्षणिक सहलीसाठी प्रतिविद्यार्थी २0 रुपये तसेच नियमित जॉगिंगसाठी येणार्‍यांसाठी मासिक शुल्क ३00 रुपये आणि वार्षिक शुल्क ३ हजार रुपये आकारण्यात येणार असून हे दर सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नसल्याचे नेरूळ शाखा क्रं. ८८ शाखा प्रमुख समीर बागवान यांनी निवेदनात म्हटले आहे. शैक्षणिक सहलीसाठी प्रवेश मोफत असवा, ज्येष्ठ नागरिकांकडून कोणतेही प्रवेश शुल्क घेण्यात येऊ नये, वंडर्स पार्कमधील देखभालीचे कंत्राट तसेच उपाहारगृह चालविण्याचा ठेका खाजगी तत्त्वावर चालविण्यास न देता, महिला बचत गटांना देण्यात यावा, पार्ककडे येण्यासाठी परिवहन सेवा सुरू करावी. त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्त किंवा नवी मुंबईचा इतिहास या ठिकाणी दाखविण्यात आला नसल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.