शिक्षक

नाशिक। दि. 4 (प्रतिनिधी)भारतीय शिक्षणपद्धतीत गुरुला फार महत्त्व आहे. इतके की गुरु हा शिष्याचा आध्यात्मिक पिता मानला जातो. ही आध्यात्मिक पितृत्वाची कल्पना अथर्ववेद, सूत्रे, स्मृतिग्रंथ या सर्व ठिकाणी आढळते. गुरुविना विद्येत प्रावीण्य मिळणे शक्य नाही, असे भारतीय शिक्षणपद्धतीत पुरातन काळापासून मानले गेले आहे. तीच भावना आजही आहे. खरे तर वेदशास्त्रांचे अध्यापन करणारा तो गुरु, असे म्हटले गेले आहे, तर साधना शिकविणारा आणि दीक्षा देणारा म्हणजे शिक्षक अशी व्याख्या करण्यात आलेली आहे. या अर्थाने महत्तम कार्य करणारे शिक्षक, त्यांची परंपरा, गुरुकुलपद्धती, गुरुचे कार्य, पुरातन आणि आधुनिक काळातील शिक्षकाचे महत्त्व आणि शिक्षण कार्यातील त्यांची उपयोगिता याविषयाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न..

पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुलेशिक्षणाचे माहेरघर म्हणून आज ओळखल्या जाणार्‍या पुणे शहरात महिलांना शिकविण्यासाठी पुढाकार घेतला तो क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी. या कार्यामुळे त्यांची भारतातील पहिल्या महिला शिक्षक म्हणून इतिहासात नोंद झाली. खंडोजी नेवसे पाटील यांच्या पोटी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी सावित्रीबाईंचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह महात्मा जोतिबा फुले यांच्याशी झाला. त्या काळात महिलांना समाजात दुय्यम स्थान होते. पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा असलेल्या समाजात शिक्षण तर दूरच; परंतु महिलांना हक्काची जाणीवही नव्हती. अशा काळात महात्मा जोतिबा फुले यांच्याकडून प्रथम प्राथमिक शिक्षण घेऊन पुढे नॉर्मल स्कूलमधून शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन अध्यापनाच्या कार्यास सुरुवात केली. प्रस्थापितांचा आणि समाजाचा विरोध डावलून सावित्रीबाईंनी पुण्यात २0 शाळा चालवून दाखविल्या. याकामी त्यांना जोतिबांचे गुरु लहूजी साळवे यांनी मदत केली. १ मे १८४७ रोजी सावित्रीबाईंनी मागास वस्तीत पहिली शाळा सुरू केली. ती शाळा मध्येच बंद पडल्यानंतर १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात सावित्रीबाईंनी पहिली मुलींची शाळा काढली. संपूर्ण भारतातील ती पहिलीच मुलींची शाळा ठरली. त्यानंतर त्यांनी आणखी दोन, तीन मुलींच्या शाळा सुरू करून शिक्षणक्रांतीची ज्योत पेटविली. सहा मुलींच्या प्रवेशाने सुरू झालेल्या सदर शाळेत लवकरच ५0 मुलींची हजेरी नोंदली जाऊ लागली. शालेय शिक्षणाबरोबरच केशवपन बंद करणे, पुनर्विवाहाचा कायदा करण्यासाठी महिलांमध्ये प्रबोधन घडविणे यांसारख्या सामाजिक शिक्षणातही सावित्रीबाईंनी स्वत:ला वाहून घेतले होते. सावित्रीबाईंनी केवळ शालेय शिक्षणच महिलांना दिले नाही तर त्या काळातील अनिष्ठ रूढींविरोधात लढा उभारण्याचे धडे देऊन महिलांना त्याविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे सावित्रीबाईंना भारतातील पहिल्या शिक्षिका होण्याचा मान तर मिळालाच; परंतु सामाजिक क्रांतीच्या प्रणेत्या म्हणूनही त्यांचे नाव इतिहासात नोंदले गेले.

उदयोन्मुख समाजात शिक्षकाची भूमिका

शिक्षणप्रक्रियेत शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते. भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान उच्च मानले गेले आहे. शिक्षकाला मार्गदर्शनाचा अधिकार देण्यात आला आहे. त्यापार्श्‍वभूमीवर शासनाने विविध धोरणेही राबविली आहेत. १९८६ च्या शिक्षणाच्या गाभातत्त्वानुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, घटनात्मक कार्ये, राष्ट्रीय अस्मिता जोपासण्याचा प्रयत्न, सांस्कृतिक वारसा, समानतावाद, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरणीय, सामाजिक अडथळ्यांचा निरास, लहान कुटुंबांचा आदर्श, वैज्ञानिक प्रवृत्तीची जोपासना ही तत्त्वे शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे कार्य शिक्षकाने करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ

ताराबाई मोडकदेशात शिक्षणाची क्रांती घडवायची असेल तर लहान वयापासूनच शिक्षण दिले गेले पाहिजे हा विचार समाजात रुजवून त्याची अंमलबजावणी करणार्‍या ताराबाई मोडक ह्या देशातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ ठरल्या. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असताना पदवीधर झाल्यानंतर त्या विवाहबद्ध झाल्या. के. व्ही. मोडक यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्या केळकरऐवजी मोडक म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. अमरावती येथे वास्तव्यास आल्या तेव्हा त्या पहिल्या स्थानिक पदवीधर महिला होत्या. प्रार्थना समाजामुळे त्यांच्यावर समतेचे संस्कार रुजले होते. पुढे संसार अल्पायुषी ठरल्यानंतर ताराबाईंनी शास्त्रीय आधार असणार्‍या पाश्‍चात्य मॉण्टेसरीचा अभ्यास करून त्याला भारतीय रूप देण्यासाठी ताराबाईंनी कार्य केले. आज बालशिक्षण जरी सर्वत्र रूढ झाले असले तरी त्या काळात ताराबाईंच्या कार्याकडे चेष्टेचा विषय म्हणूनच पाहिले जात होते. अशा परिस्थितील विरोधाला न जुमानता ताराबाईंनी १९२६ साली बालशिक्षण संघाची स्थापना केली. पाश्‍चात्य मॉण्टेसरीच्या तत्त्वांचा अभ्यास करून त्यात भारतीय जीवनपद्धती आणि संस्कृतीचा विचार करून बदल केले. त्यांचे बालमंदिरांमध्ये रूपांतर करून भारतीय नृत्यप्रकार, कलाप्रकार, लोकगीते, संगीत यांचेही शिक्षण दिले. तळागाळापर्यंत बालशिक्षण पोहोचावे यासाठी त्यांनी शासनाच्या मदतीने विविध प्रयोग राबविले. शिक्षकांचे प्रशिक्षण घेऊन त्यांच्यामार्फत खेड्यातील बालशिक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. आदिवासी विभागात शिक्षण देण्यासाठी त्यांनी सुचविलेल्या योजनाच पुढे आदर्श ठरल्या. महात्मा गांधींनीही त्यांना शिक्षणासाठी आराखडा तयार करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली होती.