शेअर बाजार कोसळला

मुंबई : शेअर बाजारात पाच सत्रांपासून सुरू असलेल्या तेजीला गुरुवारी ब्रेक लागला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १८६ अंकांनी कोसळला. चीनमधील वस्तू उत्पादन क्षेत्रातील नरमाई आणि अमेरिकेच्या प्रोत्साहन पॅकेजमधील कपात याचा परिणाम होऊन शेअर बाजारातील ही घसरण झाली आहे.
गेल्या ५ दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीत सेन्सेक्सने ५३0 अंकांची झेप घेतली होती. त्यातील १८६.३३ अंक आज एकाच दिवसात बाजाराने गमावले आहेत. दिवसभराच्या पीछेहाटीनंतर सेन्सेक्स २0,५३६.६४ अंकांवर बंद झाला.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी ६१.३0 अंकांनी कोसळून ६,0९१.४५ अंकांवर बंद झाला आहे. गेल्या ४ सत्रांत निफ्टी १५0 अंकांनी मजबूत झाला होता. चीनच्या वस्तू उत्पादन क्षेत्राबाबत एचएसबीसी व मार्केट इकॉनॉमिक्स यांनी निराशाजनक अहवाल दिले आहेत. त्याचा परिणाम आज जगभरातील बाजारांवर झाला. बोनांझा पोर्टफोलिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश गोयल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात आज विक्रीचा जोर होता. याशिवाय आज बाजारात नफा वसुलीही जोरात झाली. साधारणत: ४-५ दिवसांच्या तेजीनंतर नफा वसुली होतच असते. नफा वसुलीमुळे आज बाजारात विक्रीचा जोर आणखी वाढला. या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन सेन्सेक्समध्ये मोठी घट झाली. आशियाई बाजारांपैकी, चीन, तैवान, जपान, हाँगकाँग, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया येथील शेअर बाजारही आज कोसळले. या बाजारातील घसरण साधारणत: 0.0७ टक्के ते २.१५ टक्के या दरम्यान राहिली. (प्रतिनिधी)

सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३0 पैकी २४ कंपन्यांना घसरणीचा फटका बसला. त्यात आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, एसबीआय, टाटा स्टील, एचडीएफसी यांचा समावेश आहे.
याशिवाय हिंदाल्को, आयटीसी, कोल इंडिया, गेल इंडिया, महिंद्रा, इन्फोसिस या कंपन्यांचे शेअर्सही खाली आले.
सेन्सेक्समधील केवळ ६ कंपन्यांचे शेअर्स वर चढले. त्यात डॉक्टर रेड्डीज लॅब, बजाज ऑटो, टाटा पॉवर यांचा समावेश
आहे.