(श्री) मन्ताशेठ..

शूटिंग द स्टार्स- दिलीप कुलकर्णी

‘इस्पितळात अत्यवस्थ असताना ‘एक दिवस एक माणूस’तिथं आला आणि त्या इसमानं पित्याच्या मायेनं मोसंबीचा रस माझ्या मुखात

चमच्या-चमच्यानं भरवला. त्या कोपर्‍यातील श्रीमंत इसमास..’ ही आहे एका न लिहिलेल्या पुस्तकाची अर्पणपत्रिका आणि कोपर्‍यात बसून लिहिणारा हा इसम आहे; प्रसिद्ध लेखक श्री(मंता) मराठे! १९६0 च्या दशकात ‘मन्ता मराठे’ या नावानं या इसमानं साहित्य क्षितिज गाजवलं. लहानगा बिचारा ‘हनू’ ‘बालकाण्डा’त कामी आला. पुढे मन्ता मराठेही कुठे परागंदा झाला कुणास ठाऊक? पण नंतर अचानक ‘हमो मराठे’ हे भरजरी नाव साहित्य क्षितिजावर आक्रमण करतं झालं.

सुमारे तीन दशकांपूर्वीची ही गोष्ट आहे. आम्ही सारे ‘मनोहर’ साप्ताहिकासाठी काम करत होतो. दुपारी ठरावीक वेळी ठरावीक हॉटेलात आम्ही सारे चहाला जात असू; त्यावेळी एक इसम एका उंच मोपेडवर मागच्या वाहनांना सतत थांबण्याचे इशारे करत आमच्या अगोदर त्या हॉटेलात येई आणि एका विशिष्ट कोपर्‍यातलं टेबल अडवून चहा घेता घेता काही तरी लिखाण करी. इकडे आमच्या टेबलावर हास्यकल्लोळ चालू असताना हॉटेलमधल्या दुपारच्या बजबजाटात जराही विचलित न होता एक घोट, एक शब्द या क्रमानं (श्री)मंता आपलं लिखाण पुढे रेटीत. खाली मान घालून लिहिताना केव्हातरी, मूळची पांढरी पण मन्ताशेठनी आग्रहानं काळी केलेली केसांची चुकार बट वार्‍यानं त्यांच्या कपाळावर येई आणि श्रीमंतांच्या विमनस्क भालप्रदेशावर नाराजीची एक सूक्ष्म आठी पडे.

या सुमारे तीन-साडेतीन दशकांच्या प्रवासात मन्ताशेठची ओळख कशी झाली हे नीटसं मला आठवत नाही. या काळात कितीतरी फोटोसेशन्स झाली याचाही माझ्याकडे हिशेब नाही. फोटोसेशन करायला शेठना बारीकसंही निमित्त पुरतं. उदा. त्यांनी चष्म्याची फ्रेम बदलली, बाजारातून लाल रंगाचा डगला आणला, केसांचा रंग अचानक संपला आणि केस अचानक लाल दिसायला लागले की, त्यांचा फोन आलाच समजा! त्यांचं आणि कॅमेर्‍याचं फार चांगलं जमतं. तो समोर आला की, हे लगेच वाकडी मान करून हसायला लागतात.

मी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे जाई किंवा त्यांच्या निमंत्रणानुसार फोटोसेशनसाठी माझ्या सर्व आयुधांसह त्यांच्याकडे पोहोचे तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर एकच फ्रेम येते - ते काहीतरी लिहीत बसले आहेत. टेबलावर नाही तर खुर्चीवर पॅड घेऊन! रेल्वेच्या प्रवासातही ब्रीफकेस हाताखाली घेऊन ते लिखाण करतात. माणसांचं अध्र्याहून अधिक आयुष्य झोपेत जातं असं म्हणतात. मन्ताशेठचं तसं नाही. अध्र्याहून अधिक काळ त्यांनी बोरूधरण्यात खर्ची केला आहे.

त्यांची बायपास-सर्जरी झाली त्यावेळची गोष्ट. त्या दिवशी अगदी सकाळीच मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. मन्ताशेठ ऑपरेशनच्या पेहरावात एका कोपर्‍यात बसून काहीतरी लिहीतच होते.

एका खिडकीजवळ ते बसले होते. सकाळचा कोवळा प्रकाश त्यांच्या चेहर्‍यावर पडला होता. चेहर्‍यावरून माझी नजर त्यांच्या पेहरावावर सरकली. मला त्यांची ड्रेपरी आवडलेली दिसताच त्याही अवस्थेत ते मान वाकडी करून हसायला लागले.

आपल्या मनात प्रत्येकाची एक इमेज असते. सहसा तिला धक्का लागत नाही. माझ्या मनात यांची जी इमेज आहे ती हसरी आहे; त्यामुळे ते गंभीर झालेले मला पटत नाही.

मन्ताशेठ मूळ मालवणचे. २४ मार्च ही त्यांची जन्मतारीख; पण साल कुठलं? त्यांचे मोठे बंधू बाबलशेठ अंदाजानं १९४0 सांगतात. हे दोघेही भाऊ सारखेच दिसतात. तरी त्यांच्यात दहा वर्षांचं अंतर आहे. बाबलशेठ फार शिकले नाहीत. त्यांचं एक छोटंसं दुकान होतं शिवणाचं. उसवलेले धागे प्रेमरज्जूंनी गुंफण्याचं काम आपल्या अधू डोळ्यांखाली त्यांनी आयुष्यभर केलं. लहानग्या हनूला शिकवून मोठं करण्याचा घाट याच बाबलशेठनी घातला होता. प्रत्यक्ष जन्मदाताच यात अडसर ठरला तेव्हा प्रत्यक्ष बापाशीच उभ्या जन्माचं वैर पत्करून या अशिक्षित माणसानं शिक्षणाची कास धरली. बालपणी हनूनं जे भोगलं त्यापेक्षा काकणभर जास्त या बाबलशेठनं भोगलं. त्या अर्थानं ‘बालकाण्ड’ हे ‘बा(ब)लकाण्ड’देखील आहे.

अगदी पहिल्या फोटोसेशनच्या वेळची ही गोष्ट आहे. किलरेस्कर ग्रुपच्या, सर्व मासिकांच्या संपादकांचा परिचय फोटोसहित छापण्याची एकदा वेळ आली. बाकी इतर सर्वांचे फोटो प्रेसच्या आवारातच मी घेतले; पण या एकट्या (श्री)मंतांचे फोटो त्यांच्या घरी घेतले. मराठे हे एक आज्ञाधारक मॉडेल आहेत. खिडकीतून प्रकाश येणार्‍या एका कोपर्‍यात ते उभे होते. भरदुपारी, हवामान अजिबात थंड नसताना केवळ मी सांगितलं म्हणून एक जाडजूड स्वेटर घालून प्रसन्नपणे हसत ते त्या प्रकाशमान कोपर्‍यात फोटोसेशन संपेपर्यंत बसून राहिले.

किलरेस्कर मासिकाचे ते संपादक असताना अनेक मोठय़ा लोकांना भेटण्याची, त्यांचं फोटोसेशन करण्याची संधी मला मिळाली. १९८४ मध्ये साहित्यिकांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्याची कल्पना त्यांचीच. मन्ताशेठमधल्या अतिशय प्रांजळ माणसाचं दर्शन मला अनेक वेळा झालं आहे. कागद जसा शांतपणे आपलं म्हणणं ऐकून घेतो तितक्या शांतपणे त्यांनी मी सांगितलेल्या हकिकती ऐकून घेतल्या. त्याच्याच पुढे कथा झाल्या. १९८७ मध्ये एका कळकट हॉटेलात बसून माझ्या आयुष्यात घडलेली एक करुण कहाणी मी त्यांना सांगितली. ती कहाणी जशीच्या तशी त्यांनी मला कागदावर लिहायला सांगितली. पुढे त्यांच्याच पुढाकाराने ती गोष्ट १९८७च्या ‘किस्त्रीम’ दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली.

मला जे जे वाटेल, माझ्या मनातील खळबळ मी मन्ताशेठना सांगत गेलो. या जातिवंत संपादकाने त्याला आकार दिला. संपादक लेखकाला घडवतो का? या प्रश्नाला मी ‘हो’ असं उत्तर देईन. एवढी वादळं त्यांच्या आयुष्यात उठली, एवढे तडाखे त्यांना बसले. सर्वसामान्य माणूस त्यात संपून गेला असता; पण त्यांच्यातला क्रिएटिव्ह माणूस एवढं होऊनही जिवंत राहिला. कुठेही ते स्थिर झाले नाहीत. माझ्या माहितीत किमान एक डझन वेळा तरी त्यांनी पदभार सोडले आणि नवे स्वीकारले; पण या प्रत्येक वेळी त्यांच्याबरोबर काम करणारी माणसं तीच राहिली.

‘घरदार’ या मासिकाचा इतिहास सर्वश्रुतच आहे. त्याच्या निर्मितीमागे हेच गृहस्थ होते. तो काळ त्यांच्या आयुष्यातला अतिशय वाईट कालखंड होता. ४९८ (अ) कलमाखाली ते आरोपी होते. ‘लोकप्रभा’ हे साप्ताहिक प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांना संपादकपद सोडावं लागलं. ते अतिशय निराश झाले होते. माझ्या स्कूटरवरून आम्ही पुण्यात फिरायचो. आम्हाला असे फिरताना पाहून अनेक पत्रकार मित्रांनी मला वॉर्न केलं की, ‘लेका, एका गुन्हेगाराला पाठीशी घालून तू राजरोस फिरतोस, ए डे ईज अवेटेड व्हेन धीस फ्रेंड नाऊ बिहांईड यू, वुईल बी बिहाईंड बार्स.’

ज्या दिवसाची ही मंडळी वाट पाहत होती तो दिवस उजाडलाच नाही. नवनवीन कल्पनांनी सजलेले ‘घरदार’चे सगळे अंक अक्षरश: गाजले. ‘घरदार’च्या संचालकपदावर असणारी मंडळी गुन्हेगार प्रवृत्तीची नसती तर ‘घरदार’ नक्कीच बुडालं नसतं.

मन्ताशेठ हे माझ्या आयुष्याचा एक भाग बनून राहिलेले आहेत. १९८७ मधील ही घटना. जानेवारी महिना होता तो! माझ्या नवीन घराचा ताबा घ्यावयाचा होता. ११00 रुपये कमी होते. बिल्डर ताबा देईना. मी मन्ताशेठकडे गेलो. शेठच ते! डोक्याला मफलर गुंडाळून सकाळच्या वेळी लिहीत बसले होते. ‘मराठेसाहेब, तुमच्या लेखनसमाधीत मी व्यत्यय तर आणत नाही ना?’ सखाराम गटणे टाइप वाक्य मी बोललो आणि ते काही बोलायच्या आत पैशांची याचना केली. ‘नेव्हर से नो’ हे त्यांचं प्रिन्सिपल आहे. ते म्हणाले, ‘थांब, मलाही बँकेत जायचं आहे. आधी हॉटेलात आपण चहा घेऊ. तुझ्याकडे काही मॅटर असेल सांगण्यासारखं तर ते सांग. बँकेतच तुला पैसे देतो? आम्ही बँकेत गेलो. चेक लिहिताना ते म्हणाले, ‘तुला किती अकरा हजार पाहिजेत ना, मला एखादा हजार पुरतील म्हणजे १२ हजार लिहितो?’ त्यांना थांबवून मी म्हटलं, ‘मला फक्त अकराशे पाहिजेत.’ ‘अकराशे फक्त?’ त्यांनी तो शब्द इतका तुच्छतादर्शक टोननं काढला की, मला ती रक्कम उगाचच फारच छोटी वाटायला लागली. खरं तर माझं नवं घर त्या रकमेअभावी अडलं होतं.

‘अरे फक्त अकराशेसाठी बँकेत येण्याची जरुरी नाही, तेवढे पैसे माझ्या नाडी नसलेल्या पायजम्यातपण निघाले असते.’ मन्ताशेठ म्हणाले.

‘एक दिवस एक माणूस’ ही अभिनव कल्पना त्यांनी ‘घरदार’ मासिकात राबविली. त्या मालिकेच्या प्रत्येक लेखाच्या वेळी मी त्यांच्याबरोबर होतो. त्या लेखांचं पुढे एक मोठं पुस्तक निघालं.

१९९४ मध्ये त्या मालिकेची थट्टा करणारा एक लेख मी लिहिला. ‘ऑऽऽफ दी रेकॉर्ड’ नावाचा. त्यात या संपादकाला ‘पराठे’ नाव दिलं होतं आणि एक दिवस या ‘पराठय़ा’च्या सहवासात राहून जे जे काय ‘घडतं’ त्याचं काल्पनिक चित्रण केलं होतं. तो लेख आणि त्याचं मानधन १५00 रुपयेही त्यांच्याकडे घेऊन गेलो. माझ्यासमोरच त्यांनी लेख वाचला आणि प्रत्येक पॅरानंतर ते दिलखुलासपणे टाळी देत राहिले. लेख वाचनानंतर मी ते पैशाचं पाकीट नैवेद्य म्हणून त्यांच्यापुढे ठेवलं. ‘मिस्टर मराठे, तुमची व्यक्तिरेखा मी लेखात वापरली म्हणून ही रॉयल्टी मी तुम्हाला देत आहे.’

पण ते पाकीट माझ्या खिशात तसंच ठेवत ते म्हणाले, ‘झाली तेवढी थट्टा पुरे. आता आणखी नको.’

बायपास सर्जरीनंतरही मागच्या वर्षी (ऑगस्ट २0११) त्यांना हृदयविकाराचा झटका आला. पण त्याही तडाख्यातून आमचे मन्ताशेठ वाचले. सर्व स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी एका सकाळी मला फोन केला. ‘अरे, खूप दिवसांत तुझं फोटोसेशन झालं नाही. खूप दिवसांत मी मोकळेपणी हसलोसुद्धा नाही. तू सेशन करीत असता मला हमखास हसवतोस.’

मी त्यांच्या नवीन घराचा पत्ता शोधत गेलो. आता सहाव्या मजल्यावर ते राहायला गेले आहेत. त्यांच्या मजल्यावर जिन्यासमोरच पाटी आहे ठळक अक्षरात-

‘मराठे - अगदी उजव्या कोपर्‍यात -’

मी उजव्या कोपर्‍यात वळलो तेव्हा एका सदनिकेचं दार अर्धवट उघडं होतं. कदाचित मी येणार म्हणूनही असेल; ते ढकलून मी आत गेलो तेव्हा हे माझं ओल्डेस्ट मॉडेल, वय (कदाचित) वर्षे ७५, एक न शोभणारा लाल डगला घालून बसलं होतं. बगळ्यासारखे दिसणारे डोक्यावरचे शुभ्र केस कपाळावर सारखे येतात म्हणून डाव्या हाताचा तळवा त्यांच्यावर ठेवून उजव्या हातानं डायरीत ते काहीतरी लिहित होते. माझी चाहूल लागताच त्यांनी लिखाण थांबवलं आणि लेखणी धरलेला हात तसाच हस्तांदोलनासाठी पुढे केला. कृश झालेली शरीरयष्टी आणि बुजगावण्यासारखा दिसत असलेला तो नवीन लाल डगला. ओठात तेच चांदणं सांडणारं मुक्त अनिर्बंध हसू; पण तरीही हे मन्ताशेठ वेगळे होते. कारण इतकी वर्षे त्यांनी पोटात दडवून ठेवलेले दोन पाण्याचे ढग आज त्यांना न जुमानता त्यांच्या हसर्‍या डोळ्यांत येऊन थांबले होते.

‘मीट वुईथ माय न्यू पर्सनॅलिटी’ हस्तांदोलनासाठी माझ्या हातात दिलेला हात तसाच ठेवून मन्ताशेठ म्हणाले. त्यांच्या हातातील लेखणी काढून घेत ती माझ्या खिशात टाकत मी विचारलं,

‘खूप वर्षांपासून विचारू असं म्हणतो पण आता विचारूनच टाकतो. हे सतत तुम्ही काय लिहीत असता?’

‘देखना है?’

काही गुपित सांगायचं असलं की, त्यांचा स्वर राष्ट्रभाषेतून येतो. त्यांनी पुढे केलेल्या तीन/चार डायर्‍या मी सहज चाळल्या.

‘यात तर काहीच नाही’ मी म्हणालो. मग त्यांनी कपाटातून आणखी काही डायर्‍या काढल्या आणि म्हणाले,

‘यातली कुठलीही उघड.’

म्हणजे एकच कादंबरी मन्ताशेठनी पुन:पुन्हा लिहिली आहे की काय, असं मला वाटून गेलं. अंदाजानं मी एक डायरी उघडली; पण तुटक रेषांखेरीज त्यात काहीच मजकूर नव्हता.

‘ये क्या मांजरा है?’ मीही राष्ट्रभाषेतून विचारलं.

‘मांजर उंदीर काही नाही. माझं अक्षर उंदरा, मांजराच्या पायासारखं असेल; पण शब्दांवरच्या टोप्या स्वच्छ आणि सरळ रेषेत आहेत.’

‘म्हणजे?’

‘शब्दांना टोप्या दिल्या की ते स्वच्छ रेखीव होतात. शब्द लिहिल्यानंतर त्यांना टोप्या देण्याचं भान मला राहत नाही, तेव्हा या टोप्या मी शब्द लिहिण्याआधीच देऊन ठेवतो..’