सखींसाठी आज ‘घालीन लोटांगण’

मुंबई। दि. २९ (प्रतिनिधी)

बुवाबाजीवर घणाघाती प्रहार करणारे प्रणाली आर्ट आणि अर्चना थिएटर्स निर्मित तुफान विनोदी नाटक ‘घालीन लोटांगण’ बघण्याची संधी लोकमत सखी मंचच्या सदस्यांना मिळणार आहे. ३0 डिसेंबर रोजी दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात सायंकाळी ८ वाजता या नाटकाचा प्रयोग होणार आहे. या नाटकाचे लेखन ज्ञानेश महाराव यांनी केले आहे तर दशरथ हातिसकर यांनी दिग्दर्शन केले असून ते प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

सखी मंच सदस्यांनी आपले ओळखपत्र दाखवून शिवाजी मंदिर येथे सायं. ७.३0 ते ८ या वेळेत प्रवेशिका घ्याव्यात. उर्वरित तिकीट विक्री थिएटरवर सुरू असणार आहे. अधिक माहितीसाठी ८६५२२00२२१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सखी मंचतर्फे करण्यात आले आहे.