समतोल आर्थिक विकासाचे चिंतन

आगमन

गरीब आणि श्रीमंत ही आर्थिक दरी दिवसेंदिवस रुंदावत आहे. गरीब अधिक गरीब, तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. आहे रे आणि नाही रे हे दोन वर्ग समपातळीवर निदान समान संधीप्रत यावेत यासाठी अनेक समाजसुधारकांनी, लोकनेत्यांनी आपापल्या परीने प्रयत्न करून पाहिले; पण अजून यश मिळालेले नाही. पण तरी या विषयांचे चिंतन थांबलेले नाही.

डॉ. सदानंद विनायक नाडकर्णी या संवेदनशील ८0 वर्षांच्या समाजवादी युवकाने, समतोल आर्थिक विकासाच्या संदर्भात जे लेख वेळोवेळी लिहिले, त्या लेखांचे पद्मगंधा प्रकाशनाने नुकतेच एक देखणे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकात समाजाची रचना, माणसांचे वर्ग व बेकारी, संपत्ती व तिचे वाटप कसे होते, समाजवादाच्या नव्या पायर्‍या, बदललेला वर्ग संघर्ष, व्यक्ती आणि समाज, व्यक्तिगत आणि संघटित प्रयत्नांची संभाव्य दिशा, लोकसंख्या नियंत्रण, भ्रष्टाचार व काळा पैसा, लोकशाहीच्या अंमलबजावणीतील त्रुटी व सुधारणा इत्यादी देशासमोरील अनेक गंभीर समस्यांवर या लेखांच्या माध्यमातून पर्याय सुचवण्याचे काम या लेखकाने केले आहे.

राष्ट्र सेवादलातून जडणघडण झालेले डॉ. सदानंद नाडकर्णी हे मुंबईच्या लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (सायन हॉस्पिटल) येथे आधी सर्जरीचे प्राध्यापक व नंतर अधिष्ठाता होते व नंतर भाटिया व जसलोक रुग्णालयात मेडिकल डायरेक्टर म्हणून त्यांनी कार्य केले आहे. ४0 पेक्षा अधिक शोधप्रबंध त्यांच्या नावावर आहेत. कमीत कमी खर्चात रुग्णांची वैद्यकीय चिकित्सा कशी करता येईल यावर त्यांनी आयुष्यभर काम केले आहे. प्रत्येक गोरगरिबांसाठी कार्य करीत असतानाच, गांधीवादी व लोहियावादी विचारसरणीनुसार समाजाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय सद्यस्थितीचे वैशिष्ट्यपूर्ण विश्लेषण करून, त्यात आमूलाग्र बदल कसा घडवून आणता येईल याचे एकत्रित चिंतन त्यांनी केले आहे व ते आपल्याला या पुस्तकात वाचावयास मिळते.

स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांचा परिपोष करता यावा यासाठी भारतीय व्यवस्थेत कुठल्या दिशेने बदल करायला हवे व त्याकरता वैयक्तिक व संघटित प्रयत्न कसे केले जावे या तळमळीतून हे पुस्तक लिहिले गेले आहे. यातील ‘व्यक्ती’ आणि ‘समाज’ हे प्रकरण तर छानच वठले आहे. व्यक्तिगत सहभाग, भ्रष्टाचार व काळा पैसा, लोकशाहीतील त्रुटी व सुधारणा या प्रकरणात अनेक उपयुक्त व व्यावहारिक सूचना केल्या आहेत. आता मार्क्‍सने म्हटले तसा वर्ग संघर्ष नसून संपत्ती व साधनसामग्री एकवटलेली मोठी शहरे विरुद्ध वंचित खेडी असा झाला आहे व सरकारी नोकरशाही हाच मुख्य शोषणकर्ता शत्रू झाला आहे. त्याला वेसण कशी घालायची याचे प्रशासकीय मार्ग सुचवले आहेत. सामान्य राजकीय पक्ष कार्यकर्त्यांना ‘सरकारी मदतीने वेतन’ देण्याची व पक्षांचे ‘व्यावसायिकरण’ करण्याची कल्पना क्रांतिकारकच आहे. पर्यावरणपूरक लघुउद्योगांची माहिती व प्रत्येक जिल्हा स्वावलंबी करण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रमाचे आयोजन, निवडणूकपूर्व आचारसंहितेत सुधारणा यामुळे ग्रामीण जीवन उंचावेल यात शंकाच नाही.

परंतु लेखकाने डार्विनचा उत्क्रांतीवाद पुढे चालवून समाजाचे वर्ग करताना प्रगत मानव-जात व वंचित समाजाला वन्य मनुष्यप्राणी संबोधले आहे, हे शब्द फार खटकणारे आहेत. ज्यांच्याशी संवाद साधायचा आहे त्यांचाच गैरसमज होऊ नये म्हणून हे शब्द टाळून अन्य शब्द वापरणे आवश्यक होते. कारण मूळ उद्देश बाजूला राहून नको त्या शब्दांवरच आगपाखड होण्याची शक्यता आहे. तसेच लेखकाने हे अंत्योदय विरोधी विचार व सध्याच्या लोकशाहीला ‘नियंत्रित’ करण्याची आवश्यकता हे विचार साधार मांडले असले तरी मनाची चलबिचल करणारे आहेत.

विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना तसेच समाजात सामाजिक, आर्थिक बदल घडवून आणू पाहणार्‍या विविध एन.जी.ओंच्या संवेदनशील कार्यकर्त्यांना, तसेच जागरूक तरुण कॉलेज विद्यार्थ्यांना, समतोल आर्थिक विकासाची दिशा कशी असावी याबाबतचे ज्ञान अवगत करून घेण्यासाठी हे पुस्तक निश्‍चितच उपयुक्त आहे. हे पुस्तक म्हणजे आजच्या पर्यायी विकासनीतीबाबत एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. दुकानात मिळाले नाही तरी प्रकाशकाकडून मागवून संग्रही ठेवावे, असा हा ठेवा आहे.

व्यक्ती आणि समाज

(समतोल आर्थिक विकासाच्या संदर्भात)

लेखक : डॉ. सदानंद विनायक नाडकर्णी

पद्मगंधा प्रकाशन, पुणे

पृष्ठे - ११२, किंमत - १00 रुपये