सर्व बळी पहिल्या इयत्तेतील!

न्यूयॉर्क। दि.१६ (वृत्तसंस्था)

अमेरिकेतील कनेक्टिकट येथील प्राथमिक शाळेत झालेल्या भीषण गोळीबाराच्या घटनेत मरण पावलेली २0 मुले ६ ते ७ वर्षांची होती, असे आता स्पष्ट झाले आहे. हल्लेखोराने या चिमुरड्यांना अनेक गोळ्या घातल्या आणि १२ मुली व ८ मुलांना तत्काळ मृत्यू आला. या हल्ल्यात सहा प्रौढ माणसेही मरण पावली असून, सर्व मृतांची उत्तरीय तपासणी झाली आहे.

सँडी हूक शाळेचे प्राचार्य डॉन होश्‍चप्रुंग (४७), मानसोपचारतज्ज्ञ मेरी शेरलॅक (५६) व तीन शिक्षक रॅचेल डाविनो (२९), अँन मेरी मर्फी (५२), लॉरेन रोसिओ (३0) यांचा मृतांत समावेश आहे. या हल्ल्यात मरण पावलेली २0 मुले पहिलीत शिकत होती, असे वैद्यकीय परीक्षक वायने कार्व्हर यांनी सांगितले. हल्लेखोर अँडम लान्झा याच्याकडे तीन शस्त्रे होती. उत्तरीय तपासणी केलेल्या सर्व मुलांना ३ ते ११ जखमा होत्या. यातील १६ मुले सहा वर्षांची होती, राहिलेली ७ वर्षांची होती.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा न्यूटाऊन येथे जाणार असून, सँडी हूक शाळेतील गोळीबारात मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना भेटणार आहेत, व्हाईट हाऊसचे प्रवक्ता जे कार्ने यांनी ही माहिती दिली. ज्यांचे नातेवाईक या गोळीबारात मरण पावले त्या कुटुंबांचे सांत्वन करणार असून, शोकसभेत बोलणार आहेत, असे व्हाईट हाऊसतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेतील शीख संघटनांनी सर्व गुरुद्वारांत प्रार्थना सभा व मेणबत्ती मोर्चाचे आयोजन केले आहे.

आईला बंदुकांची आवड

सँडी हूक येथील शाळेत गोळीबार करून २६ जणांचे जीव घेणार्‍या

अँडम लान्झा याची आई नॅन्सी लान्झाला बंदुकांची प्रचंड आवड होती. ती आपल्या मुलांना शूटिंगच्या सरावासाठी नेत असे. तिचे हेच प्रेम तिच्या व इतर २६ जणांच्या मुळाशी आले व तिच्या लाडक्या मुलाने घरातील बंदुका घेऊन आधी तिचा व नंतर २0 चिमुरड्यांसह २६ जणांचा बळी घेतला.

भारताला शोक

भारताचे परराष्ट्रमंत्री सलमान खुश्रीद यांनी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांना पत्र लिहिले असून, कनेक्टिकट येथील गोळीबारामुळे धक्का बसला, असून अमेरिकी जनतेच्या दु:खात आपण सहभागी असल्याचेही खुश्रीद यांनी म्हटले आहे.