सांगलीत जैन साध्वीसह दोघे ठार

- जीपची भीषण धडक; सात जखमी

सांगली । दि. ३0 (प्रतिनिधी)

भरधाव मालवाहू जीपने धडक दिल्याने सांगलीत जैन (श्‍वेतांबर) साध्वीसह दोघे ठार झाले, तर सातजण जखमी झाले. कोल्हापूर रस्त्यावरील विष्णुअण्णा फळ मार्केटजवळील जकात नाक्यासमोर आज सकाळी ८ वाजता हा भीषण अपघात झाला. महासतेजी साध्वी सौम्यताजी (वय ४0, रा. साचोर, राजस्थान) व साधक अभय महेंद्रभाई तेजानी (३२, सांगली) अशी मृतांची नावे आहेत.

चातुर्मास महिना असल्याने साध्वी सौम्यताजी व मुख्य साध्वी लतादीदीजी यांचा कोल्हापुरात मुक्काम होता. गेल्या आठवड्यात त्या इचलकरंजीत आल्या होत्या. आज त्या सांगलीत येणार होत्या. त्यांना घेऊन येण्यास अभय तेजानी, प्रदीप बाफना, सुशील मेहता, सागर शहा, निर्मल खेमचंद , अमित पारेख, हितेश पुनमिया आदी गेले होते. साध्वींसह दहा ते बारा साधक रस्त्याच्या उजव्या बाजूने येत होते.

जकात नाक्यासमोर ते आले असता, मालवाहू जीप (क्र. एमएच-११-टी-७२६६) ने या सर्वांंंना धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, सर्वजण रस्त्यावर फेकले गेले. यात साध्वी सौम्यताजी व साधक अभय तेजानी जागीच ठार झाले, तर अन्य सात साधक जखमी झाले. साध्वी लतादीदीजी बचावल्या. जखमींना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले. अपघाताचे वृत्त समजताच सांगली कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर, शिरोळ, माधवनगरमधील जैन श्‍वेतांबर समाजातील बांधवांनी रुग्णालयात गर्दी केली होती.

जखमींमध्ये प्रदीप मोहनलाल बाफना (४६), निर्मल खेमचंद चौरडीया (४0), सुशील रमेश मेहता (३४), सागर अरुण शहा (२५), हितेश मिश्रीमल पुनमिया (३0), अमित बळवंतराय पारेख (३४) व भैरुलाल जाट (५0) यांचा समावेश आहे. या सर्वांंंंवर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी जाट यांची प्रकृती चिंताजनक आहे.

सांगलीतून गुजरात..

साध्वी सौम्यताजी व लतादीदीजी यांचा सांगलीतील लिंगायत बोर्डींंंंगजवळील जैन श्रावक संघात चार दिवस मुक्काम होता. तेथून त्या गुजरातला रवाना होणार होत्या.