सुकेळी खिंडीत अपघाताचा धोका

गोवा महामार्गावर महामार्ग प्राधिकरणाने लक्ष देण्याची मागणी

रोहा। दि. १३ (वार्ताहर)

रोहा तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे ते कोलाड दरम्यान असलेल्या सुकेळी खिंडीतील अवघड वळणांमुळे अपघात होण्याची शक्यता असून याकडे जातीने संबंधित खात्यांनी लक्ष घालून उपाय करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

मुंबई महामार्गावरील रोहा तालुक्यातील सुकेळी खिंड धोकादायक असल्याने या ठिकाणी सातत्याने लहान मोठे अपघात होत असतात. याचा त्रास मोठय़ा प्रमाणात नागरिकांना व प्रवाशांना होत असतो. हा महामार्ग तळकोकणासह गोवा राज्याला जोडणारा असल्याने या मार्गावर वाहतुकीचा प्रचंड भार असतो. वाढते, नागरीकरण, औद्योगिकरण व पर्यटन व्यवसायामुळे या मार्गावरून मोठय़ा प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. वाहनांची वाढती संख्या, वाहतुकीवर आधीच ताण पडलेला असताना या मार्गावरील खिंडीतील अवघड वळणे, अरुंद रस्ता, खचलेल्या व अपुर्‍या साईडपट्टय़ा त्यातच वळणावर चढ-उतार यामुळे चालकांचा वाहनावरून ताबा सुटणे, लक्ष विचलित होणे अशा अनेक कारणांनी या ठिकाणी अपघात घडत असतात.

अवघड वळणे, अपुर्‍या साईडपट्टय़ात अडकलेल्या या मार्गावर सूचना फलकांचा अभाव असल्याने वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने पर्यायाने अपघाताला निमंत्रण दिले जाते.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. परंतु रस्त्यावर सध्या मोठय़ा प्रमाणात दळणवळणाचा ताण पडत आहे. परिणामी होणार्‍या अपघातांना रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. धोकादायक वळण कमी करणे, जागोजागी सूचना फलक लावणे, साईडपट्टीची रुंदी आणि उंची वाढविणे आदी उपाययोजना संबंधित खात्यांनी करावी अशी मागणी प्रवासीवर्ग आणि नागरिकांकडून होत आहे.