सुन्न..!

- करारी ‘निर्भया’ची झुंज अखेर संपली; सिंगापूरमध्ये घेतला शेवटचा श्‍वास..

नवी दिल्ली/ सिंगापूर। दि. २९ (लोकमत न्यूज नेटवर्क)

राजधानी दिल्लीत एका धावत्या बसमध्ये सहा नराधमांच्या राक्षसी वासनेस बळी पडलेल्या २३ वर्षांच्या ‘निर्भया’ने गेले दोन आठवडे जगण्याच्या दुर्दम्य इच्छेने मृत्यूशी दिलेली शर्थीची झुंज आज सकाळी सिंगापूरच्या एका इस्पितळात दुर्दैवाने संपुष्टात आली व या घटनेने आधीच संतापलेला देश सुन्न झाला. अनावर शरमेने मान खाली गेलेल्या भारतावर शोककळा पसरली व रस्त्यांवर क्रोध व आक्रोश व्यक्त करत देशाच्या अनेक शहरांत हजारो लोकांनी मेणबत्त्या लावून तिला जड अंत:करणाने श्रद्धांजली अर्पण केली.

या घटनेने समूळ ढवळून निघालेल्या देशाला भविष्यात आयाबहिणींची इभ्रत शाबूत राहील याविषयी नि:संशय खात्री वाटेल असे सत्ताधार्‍यांकडून काहीही केले न जाताच निर्भयाने जगाचा निरोप घेतल्याने स्त्रियांच्या अब्रूसोबत आता त्यांचा जीवही सुरक्षित राहिलेला नाही या दारुण नैराश्याची भावना देशाच्या कानाकोपर्‍यात सर्वदूर पसरली. माझी मुलगी तर गेली.. पण आता देशातल्या इतर मुली तरी सुरक्षित राहाव्यात, हे निर्भयाच्या वडिलांनी काढलेले कातर उद्गार देशवासीयांच्या हळव्या झालेल्या हृदयांना

हेलावून गेले.

दिल्लीच्या सफदरजंग इस्पितळातील डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त करूनही निर्भयाच्या जिवाला असलेला धोका दूर न झाल्याने तिला अवयव प्रत्यारोपणासाठी जगभर नावाजलेल्या सिंगापूर येथील माऊंट एलिजाबेथ इस्पितळात हलविण्यात आले होते. तेथे भारतीय प्रमाण वेळेनुसार आज पहाटे २.३0 वाजता तिचा दुर्दैवी मृत्यू झाला, असे इस्पितळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. केविन लोह यांनी सांगितले. तिची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी इस्पितळाच्या आठ डॉक्टरांच्या पथकाने गेले दोन दिवस शक्य ते सर्व प्रयत्न केले. पण, शरीर व मेंदूच्या दुखापतींमुळे अनेक अवयव निकामी झाल्याने प्रकृती खालावतच गेली. प्रतिकूल परिस्थितीतही ती धैर्याने लढत राहिली; पण अखेर तिच्या वेदना शारीरिक क्षमतेच्या पलीकडे गेल्या, असे डॉ. लोह म्हणाले. निर्भयाचा मृतदेह रात्री उशिरा विशेष विमानाने दिल्लीत आणण्यात आला. मात्र, तिचे अंत्यविधी कुठे व केव्हा केले जाणार याविषयी तिच्या कुटुंबीयांनी अद्याप काहीही ठरविले नसल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. पीडित कुटुंबाच्या ‘प्रायव्हसी’चा आदर ठेवून तिचा मृतदेह आणला जाईल तेव्हा व तिच्यावर अंत्यसंस्कार होतील तेव्हाची कोणतीही दृश्ये प्रक्षेपित न करण्याचा स्तुत्य निर्णय ‘ब्रॉडकास्टर्स एडिटर्स ऑफ इंडिया’ने रात्री घेतला.

(पीडित मुलीची ओळख उघड होऊ नये यासाठी वृत्तामध्ये तिचा उल्लेख ‘निर्भया’ या काल्पनिक नावाने केला आहे.)

----------------------------

शीला दीक्षित यांना पिटाळले...

जंतरमंतरवर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना पाहून जमलेला जनसमुदाय भडकला. त्यांच्या विरोधात घोषणा सुरू झाल्या. शीला दीक्षित हटाव, पोलीस आयुक्त नीरज कुमार हटाव अशी घोषणाबाजी पाहून त्यांच्या सोबत आलेल्या सुरक्षारक्षकांनी त्यांना तेथे थांबण्यास नकार दिला. शेवटी त्यांनी मेणबत्ती लावली आणि गदारोळातच त्यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला.

----------------------------

जया बच्चन यांना अश्रू अनावर...

निर्भयाला श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईकर रस्त्यावर उतरले. यात सेलिब्रेटीदेखील मागे राहिले नाहीत. सायंकाळी बॉलिवूड कलाकारांनी जुहू परिसरात शांती मार्च काढला. या वेळी खासदार जया बच्चन यांना अश्रू आवरणे अशक्य झाले. मार्चदरम्यान त्या हमसून हमसून रडताना दिसल्या. देशभरातील महिलांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलायला हवीत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. खा. हेमा मालिनी, शबाना आझमी, सोनाली बेंद्रे, मंदिरा बेदी, ओम पुरी आदी कलावंत या मार्चमध्ये सहभागी झाले होते. सर्व कलावंतांनी महिलांच्या सुरक्षेच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने कडक धोरण अवलंबायला हवे, अशी मागणी केली.

----------------------------

फाशीच हवी..

- जंतरमंतरवर अनेक मुली आपल्या पालकांसोबत हातात फलक घेऊन आल्या होत्या. काहींनी सरकारवर राग व्यक्त केला तर काहींनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

- निर्भयपणे लढणार्‍या त्या तरुणीचा चेहरा कोणालाही माहिती नव्हता. मात्र, फोटोची केवळ चौकट ठेवून त्यात दामिनी असे लिहिले होते. असंख्य दिवे जंतरमंतरवर तेवत ठेवून तिला श्रद्धांजली अर्पण केली.

- जेएनयूच्या विद्यार्थिनींनी मुनिरका येथे जाऊन शांततेत निदर्शने केली; त्यांच्या हाती मेणबत्ती आणि फलक होते.

- जंतरमंतरवर अनेक दाम्पत्य हातात फलक घेऊन होते. अनेक तरुणींनी आता आम्हाला बदल हवा अशा प्रतिक्रिया दिल्या.

- जंतरमंतरवर अनेकांनी तोंडावर काळ्या पट्टय़ा बांधत रस्त्यांवर झोपून या घटनेचा निषेध नोंदविला.

- गेल्या आठवड्यातील तरुणांचे लोंढे राष्ट्रपती भवनाकडे आल्याने तारांबळ उडालेल्या सरकारने शनिवारी दिल्लीत जंतरमंतर आणि इंडिया गेट वगळता भादंविचे कलम १४४ लावले; तर इंडिया गेट व राजपथकडे जाणारे सर्वच रस्ते बंद केले.

- दिल्लीत सर्वच महत्त्वाच्या रस्त्यांवर बॅरिकेट्स लावल्याने दिल्लीला छावणीचे स्वरूप आले. राजपथ, १0 जनपथ, राष्ट्रपती भवन, इंडिया गेटकडे जाणारे सर्वच रस्ते, वायुसेना भवन, उच्च न्यायालय, यूपीएससी, सेना भवन हे सगळेच रस्ते बंद होते. सगळीकडे कडक सुरक्षा होती.

- दिल्लीतील प्रगती मैदान, मंडी हाउस, राजीव चौक, केंद्रीय सचिवालय, उद्योग भवन, पटेल चौक, जोर बाग, रेस कोर्स, खान मार्केट ही मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली होती. त्यामुळे बाहेर जाणे आणि आत जाण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र, मेट्रो बदलण्याची परवानगी दिली गेली होती.

- सिंगापूरमध्येच निर्भयाचे शवविच्छेदन करण्यात आले. दिल्लीत दुसर्‍यांदा शवविच्छेदन होणार नसून पोलिसांनी सिंगापूरच्याच वैद्यकीय अधिकार्‍यांचे बयान घेतले.

----------------------------

या तरुणीचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असा आम्ही संकल्प करू. अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ. या घटनेसंदर्भात अशी पावले उचला की ज्यामुळे आरोपींना कठोर शिक्षा होईल आणि असे प्रकार करण्यास पुन्हा कोणी धजावणार नाही.

- प्रणव मुखर्जी, राष्ट्रपती

ती तरुणी जीवन संघर्षाची लढाई हरली असली तरी आम्हाला आता निश्‍चय करावा लागेल की तिचा मृत्यू शून्यात जाऊ नये. मागील काही दिवसांत युवा भारतातील लोकांनी ज्या प्रमाणे आपली प्रतिक्रिया या घटनेवर उमटविली ती वास्तवात देशाच्या सकारात्मक बदलासाठी व्यक्त करण्यात आलेली भावना होती. तिला खरी श्रद्धांजली हीच असेल की आम्ही या भावनांना कायम ठेवू आणि एका सकारात्मक दिशेने पुढे जाऊ.

- मनमोहन सिंग, पंतप्रधान

ही घटना अत्यंत पाशवी असून, असीम साहस आणि अपराजय आत्मा कधीही मरणार नाही. आम्ही सगळे हृदयाने त्या तरुणीच्या कुटुंबासोबत आहोत. संपूर्ण देश त्यांच्या दु:खात सहभागी आहे. त्यांना न्याय मिळेल आणि तिचा संघर्ष वाया जाणार नाही.

- सोनिया गांधी, यूपीए अध्यक्षा

समाजात महिलांना सन्मानपूर्वक जगण्याच्या दृष्टीने चांगले वातावरण तयार करण्यासाठी असलेले कायदे आणि न्यायालयीन प्रक्रियांमध्ये बदल करणे गरजेचे आहे.

- अरुण जेटली, विरोधी पक्षनेते

ही ‘निर्भय मुलगी’ शक्तीचे प्रतीक बनली. महिलांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने सामाजिक बदलासाठी सुरू असलेला लढा यशस्वी होईल.

- मीरा कुमार, सभापती, लोकसभा

आज देशाच्या मुलीचे निधन झाले. या घटनेने संपूर्ण देश दु:खाच्या छायेत आहे. आमची सामाजिक मान्यता आणि परंपरा काय आहे ते या घटनेमुळे आम्हास चिंतन करण्यास भाग पाडेल.

- हमीद अन्सारी, उपराष्ट्रपती

आपण आता झोपेतून जागे झाले पाहिजे आणि देशातील मुलींना निर्भयपणे जगण्यासाठी पोषक वातावरण तयार केले पाहिजे.

- सुषमा स्वराज, विरोधी पक्षनेत्या

सामूहिक बलात्कारातील आरोपींना कठोर शिक्षा दिल्यानंतरच या मुलीला खर्‍या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. अशा प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, यादृष्टीने कायदा अधिक कठोर केला जाईल.

- सुशीलकुमार शिंदे, गृहमंत्री

सामूहिक बलात्कारातील पीडित मुलीच्या निधनाने आपल्यालाही दु:ख झाले आहे. हिंसा न करता दिल्लीतील जनतेने शांतता राखावी.

- शीला दीक्षित, मुख्यमंत्री दिल्ली

घटना जेवढी दु:खदायक तेवढीच चीड आणणारी. मात्र, त्यातल्या त्यात एकच चांगली गोष्ट म्हणायची, ती म्हणजे देशात आंदोलनाचा वणवा तरी भडकला. आता सार्‍यांनीच एकत्र येऊन लढा द्यायला पाहिजे तरच ही श्रद्धांजली ठरेल.

- अँड. वर्षा देशपांडे, सातारा

भारतात अध्यात्माचा वारसा सांगितला जातो; पण, येथील महिला सुरक्षित नाहीत हे दिल्लीतील घटनेमुळे सिद्ध झाले आहे. महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी पुरुषी मानसिकतेला मुळापासून बदलविण्याची गरज आहे. पीडित मुलीचा मृत्यू झाल्याने देशाची मान शरमेने झुकली.

- रूपा कुळकर्णी,

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या

दिल्लीतील अत्याचारित मुलीचा मृत्यू दुर्दैवीच म्हणावा लागेल. भारतात अशा प्रकारे महिलांवर अत्याचार होतात याची जाहीर कबुलीच आपण त्या मुलीला सिंगापूरला नेऊन दिली. तसेच भारतात वैद्यकीय सुविधा देण्यास आपण अपयशी ठरलो व अत्याचारात जीव गमवावा लागतो, याचीही कबुली दिली आहे. भारतातील लोकशाहीबद्दल अशा प्रकारचे चित्र निर्माण व्हावे ही नामुश्कीची गोष्ट असून, सरकारने ‘आम आदमी’च्या संरक्षणाची काळजी घ्यावी.

- डॉ. गिरधर पाटील, नाशिक

आपल्या व्यवस्थेत पोलीस, वकील आणि न्यायाधीश हे तीन महत्त्वाचे घटक आहेत. या घटकांनी बलात्कारीत महिलेकडे कशा दृष्टिकोनातून पाहायचे याचे संवेदनशील प्रशिक्षण दिले पाहिजे. सध्या न्यायालयात पीडीत महिलेला वकिलांकडून अशा अश्लील पद्धतीने प्रश्न विचारले जातात की तिचा दुसर्‍यांदा बलात्कार होतो. न्यायालयात अशा महिलांना प्रश्न विचारताना त्यांचे चारित्र्य व व्यक्तिमत्त्व यांचा विचार वकिलांनी करायला हवा. अशा घटना महिलांच्या शरीरावरच नव्हे, तर मनावरही जखम करतात. अशा महिलांनी ताठ मानेने वावरण्याचा निश्‍चय करायला हवा.

- विद्या बाळ, ज्येष्ठ

सामाजिक कार्यकर्त्या

तरुणीचा मृत्यू दुर्दैवी असून, या व्यवस्थेतला तो शेवटचा बळी ठरावा. यापुढे त्या तरुणीचे ‘मै जिना चाहती हूॅँ’ हे वाक्य एक जीवन संघर्ष बनवायचा आहे. आज देशात जन्माला येऊ इच्छिणारी मुलगी, अत्याचारग्रस्त तरुणी, हुंड्यासाठी छळली जाणारी

पीडित विवाहिता अगतिकतेने जीवन मागत आहे. यापुढे ही अगतिकता संपवून ‘मै जिऊंगी’ हा संघर्षाचा

मंत्र असणार आहे.

- वासंती दिघे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या

हा दामिनीचा नव्हे तर आपल्या देशातील माणुसकीचा मृत्यू आहे. आता खूप झाले. सरकारने गुन्हेगारांना कडक शिक्षा देण्याची हीच वेळ आहे.

- लता मंगेशकर, ज्येष्ठ गायिका

आज आपल्या देशातील माणुसकीचा मृत्यू झाला आहे. आपल्या देशामध्ये मुलगी आईच्या पोटामध्येही सुरक्षित नाही आणि बाहेरच्या जगामध्येही सुरक्षित नाही.

- अनुपम खेर, ज्येष्ठ अभिनेते

सकाळी दामिनीविषयीची बातमी ऐकली, डोके सुन्न झाले आहे. ही घटना हृदयद्रावक आहे. तिच्या आत्म्याला शांती लाभो.

- युवराज सिंग, क्रिकेटर

महिलांना बरोबरीने स्थान हवे आहे. सन्मान हवा आहे. यासंदर्भातील कारणांचा विचार करण्याची हीच वेळ आहे. महिला ही वस्तू आहे, या पुरुषी प्रवृत्तीचा देखील विचार करण्याची गरज आहे.

- शबाना आझमी, अभिनेत्री

घरामध्ये किंवा रस्त्यावर महिलांवर होणार्‍या अन्यायाचे आपण मूक साक्षीदार असतो. या मुलीच्या मृत्यूला फक्त सरकार किंवा पोलीसच जबाबदार नाहीत, आपण सगळेच दोषी आहोत.

- जावेद अख्तर, गीतकार

माफ करा, मी एक पुरुष आहे. मी तुझ्यासाठी लढेन असे मी वचन देतो. मी महिलांचा आदर करतो. यामुळेच मी माझ्या मुलीच्या डोळ्य़ात माझ्यासाठी आदर बघू शकतो.

- शाहरूख खान, अभिनेता

बदल हवे आहेत, तर तुम्ही मतदान करा. राजकारण समजून घ्या. या क्षेत्रात एकजुटीने काम करा, नाही तर तुमचा फक्त वापर करून घेतला जाईल आणि तुमचे पॅशन हे फक्त एका टीव्ही रिअँलिटी शोपुरते र्मयादित राहील.

- चेतन भगत, लेखक

आपल्या रणरागिणीने आज शेवटचा श्‍वास घेतला. तिचा दोष हाच की, ती देशाच्या राजधानीमध्ये रात्री उशिरा बाहेर पडली. तिला वाटले आपण सुरक्षित आहोत. ज्या दिवशी महिला रात्री उशिरा रस्त्यावर एकट्या सुरक्षितपणे फिरतील तेव्हा खर्‍या अर्थाने आपला देश स्वतंत्र होईल.

- अक्षय कुमार, अभिनेता

भारतील असल्याचा मला सतत अभिमान राहिला आहे. याच देशातील या घटनेने मला लाजिरवाणे केले आहे. देशाला जागे करण्यासाठी अशा आणखी किती निष्पापांचा बळी द्यावा लागणार?

- अभिषेक बच्चन, अभिनेता

प्रत्येक क्रांतीची सुरुवात ही मनातून, स्वत:पासून होत असते. म्हणूनच पहिल्यांदा आपल्या मुलांना मुलींचा, महिलांचा आदर करायला शिकवा.

- फराह खान, दिग्दर्शक

कायद्यामध्ये बदल होणे गरजेचे आहे. कायदे करणारे आणि कायद्याचे संरक्षक बदलले पाहिजेत. मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रलंबित केसेसचा निकाल लवकरात लवकर लागला पाहिजे.

- मेधा पाटकर,

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या

निर्भया दामिनी आणि तिच्यासारख्या अनेक मुली अशा प्रकरणाच्या बळी ठरल्या आहेत. त्यांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. कायद्यामध्ये बदल करून सक्षम देश घडविण्याची आवश्यकता आहे.

- मुग्धा गोडसे, अभिनेत्री

अमानत म्हणा किंवा दामिनी.. आता फक्त नावच राहिले आहे. तिचे शरीर आपल्यात नसले तरी तिचा आत्मा कायम आपल्या हृदयात असेल.

- अमिताभ बच्चन, ज्येष्ठ अभिनेते

आता तरी आपल्या राजकारण्यांना जाग येईल आणि ते काही ठोस पावले उचलतील, तेव्हा कुठे तिच्या आत्म्याला थोडीशी शांती मिळेल.

- महेश भूपती, टेनिसपटू

आपल्या देशामध्ये मोठय़ा प्रमाणात महिलांचा अनादर केला जातो. याची पाळेमुळे आपल्या संस्कृतीमध्ये खोलवर रुजलेली आहेत. आपल्या इथे पहिल्यापासूनच मुलांना शक्तिप्रदर्शन आणि वर्चस्व गाजविण्याचे संस्कार केले जातात. इतक्या वाईट प्रकारची केस पहिल्यांदाच आपल्या समोर आली आहे. लग्न झालेल्या अनेक महिलांवर असे अत्याचार होत असतात.

- श्रेया घोषाल, गायिका

वेगवेगळ्य़ा देशांतील कमीत कमी १0 टेनिसपटूनी मला विचारले, काय चालले आहे तुमच्या देशामध्ये?

- सानिया मिर्झा, टेनिसपटू

माझा राग देवावर नाही, पण लोकांवर आहे. जे लोक तिला वाचवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करीत आहेत, त्यांच्यावर माझा राग आहे; कारण माझ्या मते देवाने तिला साथ दिली आहे.

- राम गोपाल वर्मा, दिग्दर्शक

तिचा झालेला दु:खद अंत व्यर्थ जायला नको.

- सोनम कपूर, अभिनेत्री

तिच्या मृत्यू हा प्रातिनिधिक आहे. तिच्या आत्म्यास एखाद वेळेस शांती लाभेल, पण सर्व देशासाठी हा नैराश्य आणणारा क्षण आहे.

- मनोज वाजपेयी, अभिनेता

या मुलीचा मृत्यू झालेला नाही. ती अशा एका ठिकाणी गेली आहे, जिथे महिलांवर अत्याचार होत नाहीत. आपल्या महान भारत देशात अशी कुठलीही जागा नाही, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे.

- सोनाक्षी सिन्हा, अभिनेत्री

महिलांनो, तुमची शांतता तुम्हाला सुरक्षा देऊ शकत नाही. तुम्ही बोलले पाहिजे, नाहीतर तुम्हाला कायमस्वरूपी ‘गप्प’ करण्यात येईल.

- महेश भट, दिग्दर्शक

सुरक्षा आणि आदर हा महिलांचा विशेष अधिकार नाही तर हक्क आहे. तो त्यांना मिळालाच पाहिजे. आपली स्वप्नं, आकांक्षा कळण्याआधीच त्या मुलीची प्राणज्योत मालवली. तिला न्याय मिळालाच पाहिजे. तिच्यासारख्या अनेक मुली रोज अत्याचाराच्या बळी ठरतात. त्या प्रत्येक मुलीला न्याय मिळाला पाहिजे. आपण सर्वांनी मिळून त्यांच्या न्यायासाठी लढले पाहिजे.

- विवेक ओबेरॉय, अभिनेता

पुरुषांनी महिलांशी कसे वागले पाहिजे, हा संदेश या तरुणीच्या मृत्यूनंतर पुरुषांना मिळाला आहे. तिचा सन्मान होणे यातच खरा तिचा विजय आहे.

- सुहैल शेठ, लेखक

या घटनेमुळे देशातील जनतेला जाग आली आहे. आपल्या राजकारण्यांच्या मनात आता तरी झोपेतून उठायची इच्छा निर्माण झाली आहे की नाही? की अजूनही त्यांना वाटते, हे सगळे निवळेल?

- कुणाल कपूर, अभिनेता

----------------------------

अभिनेते ओम पुरी यांनी ३१ डिसेंबरच्या दिवशी सर्वसामान्य जनतेला काळी पट्टी बांधून याप्रकरणी निषेध व्यक्त करण्याचे आवाहन केले. वांद्रे येथे कार्टर रोडवर विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन त्या प्रकरणातील तरुणीला ताबडतोब न्याय मिळवून देण्याची मागणी केली. तसेच ‘बलात्कार्‍यांना शिक्षा द्या’, ‘कायद्यात या शिक्षेची तरतूद व्हायलाच पाहिजे’ अशा मागण्या विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आल्या.

सेलीब्रिटींनीही जुहूत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यात अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी, संगीतकार जावेद अख्तर, अभिनेत्री जया बच्चन, अभिनेता रणवीर सिंग, अभिनेता ओम पुरी, अभिनेत्री हेमा मालिनी, तिष्का चोप्रा, सोनाली बेंद्रे, मंदिरा बेदी, सौफी चौधरी, शर्लीन चोप्रा, गायक सोनू निगम, कैलास खेर यांनी मुलींच्या संरक्षणार्थ ठोस पावले उचलण्याची मागणी केली. याप्रसंगी अभिनेत्री जया बच्चन भावनाविवश झाल्या. त्यांनी देशभरातील मुलींच्या मनस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.