स्फोटकांचा अवैध साठा जप्त

वाशिम । दि. २२ (वार्ताहर)

स्फोटक पदार्थाची अवैध वाहतूक करणार्‍या दोघांना परिविक्षाधिन पोलिस उपविभागीय अधिकारी बी.बी. महामुनी यांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ५ लाख ७४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही घटना आज (दि. २१)सकाळी ९ वाजताचे सुमारास घडली.

मंगरूळपीरहून वाशिमच्या दिशेने आर.जे. ३0 आर.ए. २८६९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये अवैधरीत्या स्फोटक पदार्थाची वाहतूक करीत असल्याची माहिती परिविक्षाधिन पोलिस अधिकारी महामुनी यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर महामुनी यांनी जमादार भगवान गावंडे, नितीन टवालारकर, शिवाजी वाणी व रवी वानखेडे यांचा समावेश असलेल्या पथकाने मंगरूळपीर मार्गावरील जागमाथ्याजवळ सापळा रचला. या सापळ्यामध्ये स्फोटक पदार्थाची अवैधरीत्या वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरसह दोघांना ताब्यात घेतले.

स्फोटकांची वाहतूक झाली नित्याचीच

शहराबाहेरील जागमाथा परिसरात परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या पथकाने आज अवैध स्फोटकांची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला असला तरी अशा वाहनांची वाहतूक जिल्ह्यात नित्याचीच झाली आहे. पोलिसांची किंचितही भीती मनात न बाळगता सदर ट्रॅक्टर चालक दिवसाढवळ्या आपल्या ट्रॅक्टरमधून स्फोटकांची वाहतूक करीत असतात.