हापूसला लागली किडीची नजर

मोठय़ा प्रमाणात आलेल्या पालवीवर प्रादुर्भाव

रत्नागिरी। दि. १३ (प्रतिनिधी)

हवामानातील बदल, ढगाळ वातावरण आणि नुकत्याच झालेल्या नीलम वादळामुळे आंब्याला पालवी येण्याचे प्रमाण अधिक आहे. परंतु पालवीवर किडीचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर अचानक तापमानात वाढ झाली. मध्येच ढगाळ वातावरण, शिवाय शेवटच्या आठवड्यात नीलम वादळ झाले. संमिश्र वातावरणाच्या परिणामामुळे आंबा पिकास पालवी येण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र, कोवळय़ा पानांवरही तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. काही ठिकाणी फुलकिडी, शेंडा पोखरणारी अळी यांचा प्रादुर्भावही दिसून येत आहे. यामुळे पानातील अन्नरस तयार करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवाय मोहर निघण्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र साबळे यांनी सांगितले की, शेतकर्‍यांनी खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने एका कीटकनाशक, बुरशीनाशकांची फवारणी करून घ्यावी. आंबा कलमांच्या अळय़ात गवत, लहान झाडे काढून स्वच्छता ठेवावी. कलमा भोवतीच्या अळी कुदळीने जमीन हलवून घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

कृषी अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य कीटनाशकांचा वापर करून कीड व रोगाचे नियंत्रण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांच्या अनुभवांती शेतकर्‍यांना आंबा पिकाचे चांगले उत्पन्न मिळालेले नाही. हवामानातील कमी-जास्त तापमान, कीड, रोगांचा प्रादुर्भाव, मोहोरगळ, फळगळामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.