हिरवे कबुतर

अरण्यात.

- बैजू पाटील

भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? या प्रश्नाचे मोर हे उत्तर अनेक जण ताबडतोब देतील. ते बरोबरही आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? असा प्रश्न विचारला तर त्याचे मात्र उत्तर सगळ्यांनाच देता येईल, याची शाश्‍वती नाही. आपला कुणी राज्यपक्षी आहे, हेही अनेकांच्या गावी नसते; परंतु राष्ट्रीय पक्ष्याप्रमाणे अनेक राज्यांनी आपले राज्यपक्षीही घोषित केलेले आहेत. त्यानुसार महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे हिरवे कबुतर - ग्रीन पीजन.

रंगाने हिरव्या असणार्‍या कबुतराच्या अनेक प्रजाती आहेत. उदाहरणार्थ निकोबार बेटसमूहावर प्रामुख्याने आढळणारे जे हिरवे कबुतर आहे ते गडद चमकदार हिरव्या रंगाचे असते आणि ते आकाराने अन्य हिरव्या कबुतर प्रजातीपेक्षा काहीसे मोठे आणि गुबगुबीत असते. तर हिमालयात आढळणार्‍या हिरव्या कबुतराचा आकार लहान असतो आणि त्याच्या छातीचा रंग नारिंगी असतो. अन्य काही कबुतरांमध्ये मुख्य रंग हिरवा असला तरी अन्य रंगांचेही पुंजके त्यांच्या शरीरावर असतात.

महाराष्ट्राचा राज्यपक्षी म्हणून जे हिरवे कबुतर निवडलेले आहे, त्याला ओळखायची एक मुख्य खूण म्हणजे त्याचे पाय पिवळ्या रंगाचे असतात. त्याचे शास्त्रीय नाव Treron phoenicoptera असे आहे. ते हिमालय आणि उत्तरपूर्वेकडील भाग वगळता उर्वरित भारतात सर्वत्र आढळते आणि त्याचा आढळ महाराष्ट्रात ठळकपणे आहे. या पक्ष्याचा सरासरी आकार ३0 ते ३५ सेंटिमीटर एवढा असतो. त्याच्या अन्य शारीरिक वैशिष्ट्यांची आणि रंगसंगतीची कल्पना या पक्ष्याच्या रंगीत छायाचित्रावरून येते.

इंग्रजीत पिजन आणि डोव्ह असे दोन शब्द या पक्षी प्रजातीसाठी आहेत. हे दोन्ही पक्षी एकाच कुळातील म्हणजे फॅमिली कोलुंबिडी यात मोडतात. फरक ढोबळमानाने एवढाच की, डोव्ह असे संबोधले जाणारे पक्षी आकाराने पिजनपेक्षा काहीसे लहान असतात. हिरव्या कबुतरांसाठी हिंदी भाषेत ‘हरियाल’ असेही संबोधन आहे. विविध जाती, उपजातीची हिरवी कबुतरे ही विविध प्रकारची फळे आवडीने खाणारी कबुतरे असतात. विशेषत: बोरे, उंबरे, वडाची फळे त्यांना अधिक प्रिय असतात. फळांनी लगडलेल्या या झाडांवर हिरव्या कबुतरांचा थवा फळांचा समाचार आरामात घेत असतो. कारण ती प्रयत्न करूनही आपल्याला तत्काळ दिसत नाहीत. त्या हिरव्या पाना-फांद्यात हिरवी कबुतरे बेमालूमपणे मिसळून गेलेली असतात. बंदुकीचा वा फटाक्याचा मोठा आवाज केल्यावर जेव्हा त्या झाडांवरची अनेक हिरवी कबुतरे आकाशात उडतात तेव्हा आपल्याला पत्ता लागतो की, त्या झाडावर ती होती. एरवी ती सहजासहजी दिसत नाहीत. त्यामुळेच त्यांची फोटोग्राफी अवघडही असते.

हिरवी कबुतरे थव्यानेच वावरत, विहरत असतात. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात याचे रंग छान विकसित आणि तजेलदार झालेले असतात. सकाळच्या कोवळ्या उन्हात ती फारच सुंदर दिसतात. हे फोटो मी औरंगाबाद जिल्ह्यातील ‘गौताळा’ अभयारण्यात काढलेले आहेत. आठशे मि.मी. भिंगाचा वापर करून काढलेले आहेत. गेली पंधरा-वीस वर्षे मी गौताळा अभयारण्यात वन्यजीव छायाचित्रणासाठी नियमित जातो. पूर्वी मी या जंगलात नीलगाय, रानडुकरे, खवल्या मांजर, बिबटे असे अनेक प्राणी पाहिले होते. वेगवेगळ्या जातीची घुबडं, गरुड, घारी, ससाणे असे शिकारीपक्षी होते. आता अनेक कारणांमुळे या जंगलातील पशु-पक्ष्यांची संख्या खूप कमी झाली आहे. पाण्याचा अभाव हे त्याचे मुख्य कारण आहे. अन्यही अनेक कारणे आहेत.

माझ्या या प्रवासात असे किती मित्र भेटले.

अजूनही भेटतात.

मीच जातो त्यांना भेटायला. त्यांच्या घरी. जंगला-वाळवंटात.

इतक्या वर्षांच्या दोस्तीच्या या काही कहाण्या. त्या तुमच्यासोबत वाटून घेता आल्या याचा आनंद.

. या मित्रांना भेटा.

हे घर आपले आहे, पण त्याहीआधी ते त्यांचे आहे.

शब्दांकन : सुधीर सेवेकर

(समाप्त)