९७% संगीताच्या शोधात.

- गायनातील नवनवीन वाटा धुंडाळतानाच आदिम संगीताचा शोध घेण्यासाठी आदिवासींबरोबर राहणार्‍या-जगणार्‍या

ख्यातनाम गायिका प्राची दुबळे यांच्याशी एक संवाद

तुम्ही ठुमरी, दादरा, गझल, सूफी संगीत असं सगळ्या प्रकारचं गायन केलं आहे. इतक्या वाटा एकदम चालून पाहाणं तुम्हाला कसं साधलं?

हे खरंतर त्या त्या कलाकाराच्या प्रकृतीचा जो धर्म असतो त्यावर अवलंबून असतं. मी मूळची बडोद्याची. घरातलं वातावरण मराठी. पण मी ज्या भागात रहायचे तिथले शेजारी मुस्लीम होते. त्यामुळे त्यांच्या संस्कृतीची तसेच गुजरातमध्ये राहत असल्यानं गुजराती संस्कृतीची ओळख मला झाली. आई-वडील दोघेही कलाकार. त्यामुळे साहजिकच मराठीबरोबरच गुजराती, उर्दू, हिंदी, इंग्रजी आणि बंगाली या भाषाही त्यांच्या वैशिष्ट्यांसह मला यायला लागल्या. या भाषांच्या संगीतातलं सौंदर्यही आपसूकच कळत गेलं. आपण जे शास्त्रीय संगीत म्हणतो ते खरं तर फक्त तीन टक्के आहे. मग बाकीचे जे ९७ टक्के संगीत आहे ते काय आहे हेही आपल्याला कळलं पाहिजे. गाता आलं नाही तरी समजलं पाहिजे. ‘एव्हरीथिंग इज कनेक्टेड टू एव्हरीथिंग’ या सुप्रसिद्ध वचनासारखे, प्रत्येकाचा प्रत्येकाशी काही संबंध आहे तो उलगडायला हवा. माझा स्वभावही बहिर्मुखी आहे. त्यामुळेही असेल कदाचित, एकाच गोष्टीचा ध्यास घेण्याऐवजी मला आनंद मिळतो त्या अनेक गोष्टी मी आपल्याशा करत गेले.

गाणं करताना तुम्ही संशोधनाकडे कशा वळलात?

‘भाषा रिसर्च सेंटर’ या बडोद्यातल्या स्वयंसेवी संस्थेच्या संगीत विभागासाठी मी काम करते. संस्थेचे प्रमुख डॉ. गणेश देवी हे माझे गुरू. आपल्या देशातच आज शेकडो भाषा आहेत. त्यातल्या बर्‍याच भाषांची आपल्याला माहितीही नाही. या मरणप्राय भाषा समोर आणण्यात डॉ. देवी यांचा मोठा हातभार आहे. आजचं आपलं संगीत े आदिम संगीतावरच आधारलेलं आहे. मग खरं संगीत समजून घ्यायचं तर हे आदिम संगीत काय आहे, आपला पाया काय आहे हे समजून घ्यायला हवं, असं त्यांचं म्हणणं. माझे दुसरे गुरू अशोक रानडे - ज्यांना पहिले संस्कृती संगीत शास्त्रज्ञ म्हटलं जातं, त्यांचंही हेच म्हणणं. आदिम कलेला, संगीताला जी हजारो वर्षांची परंपरा आहे ती जाणून घ्यायला हवी. कारण हे सगळं एकमेकात गुंतलेलं आहे. ठुमरी, लोकगीत तुम्ही वेगळं केलं तर वेगळं, नाहीतर नाही. कारण कुठंतरी त्याचा स्त्रोत एकच आहे. त्यामुळे मी जे गाणं म्हणते त्याचा उगम जाणून घ्यावा ही भावना या संशोधनामागं आहे.

हे काम करताना नेमकं काय उद्दिष्ट समोर होतं?

आदिवासी, त्यांच्या संस्कृती, त्यांच्या चालीरीती यावर आधीही आम्ही काम करत होतोच. पण संशोधन करताना साहजिकच त्यात अधिक शिस्त आली. आदिवासी संगीत हे मौखिक आहे. आपल्याकडे परंपरानुसार अनेक मौखिक गोष्टी चालत आल्या असल्या, तरी बर्‍याचदा त्या काळानुसार नष्ट होतात, असा अनुभव आहे. त्यासाठी या संगीताचं दस्तऐवजीकरण व्हायला हवं हा मुख्य हेतू. हे सगळं लिहून काढलं, त्याला एक स्वरलिपी दिली तर या सगळ्या संगीताला एक ओळख मिळू शकते. या सगळ्या परंपरागत गोष्टी झपाट्यानं नाहीशा होताहेत, त्यामुळे त्यातलं र्मम, सार, त्यातलं वैविध्य हे पुढच्या पिढय़ांपर्यंत यायचं तर ते सगळं सांभाळून ठेवायला हवं, असं वाटत होतं. आपल्याच देशातल्या खूप मोठय़ा आणि कलासमृद्ध समाजाबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. ही माहिती करून द्यायची गरज आहे. त्यासाठी मी वेगवेगळ्या आदिवासी भागांत जाते, शक्य तिथं त्यांच्या घरी रहाते, त्यांचं गाणं, सगळंच आयुष्य समजून घेते. त्याचा दस्ताऐवज करते. मला यासंदर्भात जे काही कळलंय, जाणवलंय त्याची टिप्पणी करते. थोडक्यात, या सगळ्याचा उपयोग नागरी आणि आदिवासी जीवनातील दुवा म्हणून व्हावा हा प्रयत्न आहे. आता या कामासाठी टाटा समूहाने ‘नॅशनल फोकलोअर सेंटर’तर्फे मला फेलोशिप दिली आहे.

आदिवासी संगीताची वैशिष्ट्यं काय आहेत?

आदिवासींचं संगीत हे त्यांचं आयुष्यच आहे. सगळ्या गोष्टीत त्यांना संगीत दिसतं, जाणवतं. अगदी साधं उदाहरण. पिलू ही तिथं रस्त्याच्या कडेला सापडणारी एक वनस्पती. अगदी या वनस्पतीशी संबंधितही गाणी आहेत. त्यांच्या आयुष्यातला कुठलाही प्रसंग गाण्याशिवाय पूर्ण होत नाही. लग्नाच्या वेळेला ते रूदन गीत म्हणतात. लग्न होणारी मुलगी गोलात बसते आणि बाकीच्या तिच्याभोवती फेर धरून गाणं म्हणतात. याला रूदन गीत का म्हणायचं? तर ‘आताच रडून घे, यापुढं तुला खंबीर व्हायचं आहे, त्यामुळे रडायची संधी नाही’ असं या गाण्यातून या मुलीला सांगितलं जातं. मृत्यूनंतरही ते त्या व्यक्तीला एकप्रकारे उत्सवच करून निरोप देतात. इथलं जीवन आणि गाणं वेगळं नाही, तसंच इथले कलाकारही इतरांपेक्षा वेगळे नाहीत. प्रत्येक आदिवासीच कलाकार असतो, आपण गाणं म्हणताना तंबोरे लावतो, आवाज साफसूफ करतो, पाणी पितो, साथीदारांना सूचना करतो, एक वातावरण तयार करतो. हे वाईट आहे असं नाही. ते एक संस्करण आहे. पण आदिवासींना गाण्यासाठी अशा कुठल्याच गोष्टींची गरज नसते. त्यातूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या संगीतात कप्पे नाहीत. गायन, वादन, नर्तन हे सगळं प्रत्येकालाच येतं. थोडक्यात, संगीताची संपूर्णता आदिवासी आयुष्यात दिसते.

प्रत्येक आदिवासी समाजाची गाणी, संगीत वेगळं असतं का?

प्रत्येक समाजाची संस्कृती वेगळी त्यामुळे अर्थातच त्यांची गाणीही वेगळी. आर्य, द्रविड या जशा वेगवेगळ्या संस्कृती प्राचीन भारतात होत्या, तशाच या संस्कृतीतून आणि निरनिराळ्या प्रदेशांतून आलेल्या आदिवासींमध्ये खूप वैविध्य आढळतं. खरं सांगायचं तर हे वैविध्य इतकं आहे की, ते समजून घ्यायला एक जन्म कमी पडावा.

आदिवासी हे फारसे लोकांत मिसळणारे नाहीत. त्यांचं आयुष्य समजावून घेताना भाषेचा अडसर आला का?

आदिवासी इतर लोकांत मिसळत नाहीत याचं कारण आपणच आहोत. आपण त्यांची जंगलं उद्ध्वस्त केली, त्यांचे डोंगर नष्ट केले, एकप्रकारे त्यांच्या जगण्यावरच हल्ला केला. त्यामुळे त्यांना नागरी लोकांबद्दल विश्‍वास वाटत नाही. आदिवासींची भाषा आहे, पण लिपी नाही. मग लिपी नाही म्हणून आपण ही भाषा आहे हेच नाकारतो. एकप्रकारे हे त्यांचं अस्तित्वच नाकारणं आहे. मग ते कसे तुमच्याजवळ येतील? मुळात आदिवासी अंतर्मुख असतात कारण ते निसर्गाच्या जवळ राहतात. तिथे इतकी अद्भुत शांतता असते की, त्यांना बोलायची गरज पडत नाही. त्याशिवाय ते काही सांकेतिक खाणाखुणा वापरतात. त्यामुळेही ते जास्त अबोल वाटतात. मला त्यांच्याबरोबर वावरताना भाषेचा प्रश्न सतावतोच. पण माझ्याबरोबर दुभाषा असतो. त्यामुळे काम सोपं होतं. मी खूपदा त्यांच्या घरात राहते. तिथेच खाते-पिते. त्यांच्यावर एकदा विश्‍वास टाकला की, ते तुमच्यासाठी काहीही करतील हा माझा अनुभव आहे.

सध्या तुमचं संशोधन कुठवर आलंय?

नुकताच या कामावर आधारित ‘प्रतिसाद’ ही सीडी प्रसिद्ध झाली. आदिवासी जे गातात, ते गाणं एका बाजूला आणि त्यांची स्वरलिपी, त्याचा अर्थ समजून घेऊन मी त्यांना दिलेला प्रतिसाद दुसर्‍या बाजूला, असं या सीडीचं स्वरूप आहे. ‘भारतीय आदिम संगीत, गुजरात-स्वरलेखन एवं भावार्थ’ हे पुस्तकही प्रसिद्ध झालं आहे. हा अर्थात पहिला टप्पा आहे. या कामात माझ्याबरोबर भाषाशास्त्रज्ञ, मानववंश शास्त्रज्ञ, काही तंत्रज्ञ अशी मंडळी आहेत. मला येणार्‍या भाषांमुळे मी उत्तर आणि पूर्वेकडचं संशोधन करू शकत असले, तरी दक्षिणी भाषा मला येत नाहीत. त्यामुळे तिथं काम करण्यासाठी अजून एक टीम तयार करायचं काम सुरू आहे.

आदिवासींचं आयुष्यही त्यांच्या गाण्याइतकंच निर्भर, पारदश्री आहे असं म्हटलं जातं. तुमचा काय अनुभव आहे?

त्यांना आपण मागासलेले समजतो, खरंतर ते आपल्यापेक्षा पुरोगामी आणि अधिक सुसंस्कृत आहेत. लहान मुलांना ते कधीही मारत नाहीत. त्यांची घरं विलक्षण स्वच्छ असतात. विधवाविवाह हा सर्वमान्य आहे आणि आपला जोडीदार निवडायचा अधिकार त्या स्त्रीला असतो. तरुण-तरुणी एकत्र राहून, मुलं झाल्यावरही लग्नाचा निर्णय घेऊ शकतात. ‘बाली फूल’ अशी त्यांच्यात एक प्रथा आहे. एखादं जोडपं-मग ते विवाहित, घटस्फोटित कुणीही असेल-त्यांनी जर ‘बाली फूल’ म्हणजे कानामागं फूल लावून एकत्र यायचा निर्णय घेतला तर हा समाज त्यांना कसलीही आडकाठी करत नाही. खर्‍या अर्थानं मुक्त आणि दुसर्‍याच्या मनाचा, विचारांचा आदर करणारे हे लोक आहेत.

गेली तीन-चार वर्षं तुम्ही संशोधन करताहात. एक गायिका म्हणून आणि एक माणूस म्हणून तुम्हाला या संशोधनानं काय दिलं?

एक माणूस म्हणून मी नक्कीच बदलायला लागले आहे. माझ्या गरजा कमी होत्याच, त्या अजून कमी झाल्या. कपडे, खाणे-पिणे याबाबतचा आग्रह कमी झाला. मी आता एकटी कुठेही जाऊ शकते, राहू शकते. मुख्य मी बरीचशी निर्भय बनले आहे. म्हणजे मला अजिबातच भीती वाटत नाही असं नाही; पण ती वाटली तर तिच्याकडे कसं बघायचं हे मी शिकले आहे. कलाकार म्हणून तर मला खूप काही मिळालं. जे काही वेगवेगळं संगीत मी गायले आहे ते एकजीव असल्याचं जाणवलं. भारतीय संगीतातल्या निरनिराळ्या प्रवाहांचा एकमेकांशी किती जवळचा संबंध आहे आणि संगीत -मग ते कुठलंही असो-सगळे बंध फोडून तुमच्यापर्यंत कसं पोचू शकतं हे मला फर चांगलं कळायला लागलं आहे.

कुठल्याही कलाकारानं किंवा व्यक्तीनंही आपल्या चौकटीबाहेरचं जग बघणं, अनुभवणं हे फार महत्त्वाचं आहे असं आता तुम्हाला वाटतं का?

नक्कीच. विशेषत: कलाकारानं तर या चौकटी तोडाव्यातच. तर तो अधिक समृद्ध हेाऊ शकतो. माझे गुरू प्रा. सतीश बहादूर यांनी मला भाषेची बांधणी आणि पोत याबद्दल शिकवलं होतं. ते म्हणायचे, संगीत कुठे असू शकतं तर यातल्या अवकाशात असू शकतं. हे मला आता जास्त चांगलं जाणवतंय. या अनुभवानं मी जास्त मोकळी आणि प्रयोगशील झाले आहे आणि माझ्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे.

मुलाखत : सीमा भानू