शोधा
 • राजकारणाते हेट स्पीच

  लोकमत - रवि, १३ एप्रिल २०१४

  निवडणुकीमधील भाषणे ही समाजमन प्रगल्भ करणारी असावीत, ही झाली अपेक्षा; पण सध्या आरोप-प्रत्यारोपांतून नुसतीच विखारी टीका होताना दिसत आहे. द्वेषपूर्ण भाषा हेच निवडणुकीतील प्रचारसभांचे वैशिष्ट्य झाले आहे. मरणासन्न अवस्थेत कुणी कोणाला काय खायला-प्यायला दिले? इथपर्यंत हे आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.. खरंच अशाने लोकशाही प्रगल्भ होईल?भारताचे प्रश्न अत्यंत बिकट आणि गुंतागुंतीचे असून, आपण सर्व माणसे लहान आहोत, असे पंडित नेहरू मानत असत. ‘सरकारमधील विविध खात्यांतर्फे होणार्‍या हेरगिरीमुळे गोंधळ होत असून, पंतप्रधानांच्या हातीच हेरगिरीची सर्व सूत्रे असावीत,’ असे एका मंत्र्याने सुचवले होते. तेव्हा ‘देशाचे प्रश्न गंभीर असले, तरी आपण माणसे लहान आहोत. म्हणून कुण्या एकाच्या हाती सत्ता अतिरेकी प्रमाणात केंद्रित करणे घातक ठरेल,’ असे उत्तर पं. नेहरूंनी दिले होते. भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्याचे वर्णन ‘मोदीफेस्टो’ असे करण्यात येत आहे. पक्षापेक्षाही नेता वरचढ ठरत असून, कधी एकदा त्या खुर्चीत जाऊन बसतो, अशी घाई भाजप पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना झाली आहे. तर सत्ता टिकवण्याचा काँग्रेसप्रणीत यूपीएचा शर्थीचा प्रयत्न आहे. भाजपचे अधिकारशाहीचे गुजरात मॉडेल, राहुल गांधींचे सामान्यांना, महिलांना व कार्यकर्त्यांना सक्षम करणारे सबलीकरणाचे मॉडेल आणि ‘आम आदमी’ (आप) पक्षाचा स्वराज्याचा फॉर्म्युला यांच्यातील ही लढाई आहे; मात्र या लढाईमधील प्रचाराची पातळी इतकी खाली आली आहे, की यापेक्षा खाली जाता येणे कुणालाही शक्य नाही! पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना ‘निकम्मा’ असे संबोधण्यापर्यंत विरोधी पक्षांनी पूर्वीच मजल मारली आहे. भाजपचे भीष्मपितामह लालकृष्ण अडवाणींनी त्यांना ‘कमजोर’ ठरवले. मात्र, नमोंसमोर त्यांनी स्वत: नांगी टाकल्यानंतर, अडवाणींना ‘दुबळा’ ठरवण्याचे स्वातंत्र्य डॉ. सिंग यांनी शक्य असूनही घेतले नाही! भाजपच्या एका आमदाराने सोनिया गांधी व राहुल गांधी यांना निर्वस्त्र करून इटलीत हाकलण्यासंबंधीचे वक्तव्य केले; पण पक्षाच्या एकाही नेत्याने निषेध केला नाही.इथे एक घटना आठवली. संयुक्त महाराष्ट्रासंबंधी चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ गेले असता, पं. नेहरूंशी बोलताना एसेम त्यांना ह्यसर असे संबोधत, याबाबत मंडळातील काहींनी नाराजी व्यक्त केली, तेव्हा एसेम यांनी प्रथम त्यांच्या खास आवाजात विचारले, ‘सर म्हणू नको तर काय .. (एक शिवी) म्हणू?’ नंतर ते म्हणाले, ‘पंडित नेहरू पंतप्रधान आहेत, पण त्यांना नेता मानून माज्यासारखे पूर्वी आंदोलनात आले होते. त्यांचे-आमचे मार्ग भिन्न असतील, पण त्यांच्याबद्दलची आमची भावना कायम आहे.’ … आणखी »राजकारणाते हेट स्पीच

 • ज्ञान विज्ञान

  लोकमत - रवि, १३ एप्रिल २०१४

  आपण झोपलो, की ठराविक वेळेत उठण्यासाठी गजराचे घड्याळ वापरतो. त्याआधी युरोपात बर्‍याच मठातील जोगी अंगठा आणि त्या शेजारचं बोट यांच्यात मेणबत्त्या बांधून त्या पेटवत आणि झोपत. या मेणबत्त्या वेगवेगळ्या लांबीच्या असत. त्या साधारण ४-५ तास जळू शकत. त्या संपत आल्या, की चटका बसून हे शिकाऊ धर्मगुरू जागे होत. र्जमनीत वुर्झबर्ग येथे १३५0 ते ८0 दरम्यान कधी तरी गजराची घड्याळं अस्तित्वात आली. ती तेव्हापासून श्रीमंतांकडे वापरात होती. दुसर्‍या महायुद्धानंतर ती घराघरांत पोहोचली. फ्रँक क्लार्क या बर्मिंगहॅम इथल्या लोहाराचा परंपरागत व्यवसाय बंदुका बनवण्याचा होता. त्यानं १९0२मध्ये एका यंत्राचे एकाधिकार मिळविण्यासाठी अर्ज केला. या शोधाचं नाव होतं ‘क्लॉक दॅट मेक्स टी (ऑर कॉफी)’ आजही हे यंत्र बनवलं जातं. गजराचं घड्याळ हे वाजतं आणि त्याचा ताण सुटला स्प्रिंगची गुंडाळी उघडली गेली किंवा तिची हालचाल आपण खटका दाबून थांबवली, की गजर वाजायचा थांबतो. काही वेळा कुंभकर्णाच्या आधुनिक अवतारांवर याचा अजिबात परिणाम होत नाही. तेव्हा १९७६मध्ये पीटर मॅकनील याने ‘कोल्ड एअर ब्लास्ट वेकअप अँपरेटस’ तयार केलं. नावाप्रमाणे जर गजर झाल्यावर ठराविक वेळात या यंत्राचं बटन दाबून ते बंद केलं नाही, तर या यंत्रातून थंडगार हवेचा फवारा झोपलेल्या माणसाच्या अंगावर येतो आणि हे कुंभकर्ण मग जागे होतात. नाही तर हा फवारा ते जागे होईपर्यंत चालूच राहतो.पावाचे काम करणारे यंत्रआपण बाजारातून पाव आणतो त्याच्यावरचे कागदी किंवा प्लॅस्टिकचे आवरण काढतो. आत व्यवस्थित एकाच आकाराचे काप असतात. काप ज्याला स्लस, इस्लाइस अथवा सरळ स्लाईस असे इंग्रजीत म्हटले जाते, अशी न कापलेली पावाची लादी घरी आणून ती कापायचा प्रयत्न करून बघा. खाली भरपूर चुरा आणि वाकडे काप हाती येतात. पूर्वी युरोपात लोक पाववाल्याकडून मोठमोठय़ा लाद्या घरी आणत आणि त्याचे लचके हातानं तोडून कालवणात भिजवून खात. अर्ल ऑफ सँडविचनं पत्ते खेळताना खाण्यात वेळ जाऊ नये म्हणून नोकराला ‘ब्रेडचे काप करून दोन कापांत डुकराच्या मांसाचा पातळ काप ठेवून तो खायला दे’, अशी आज्ञा केली. हे सँडविच खूप झपाट्यानं पाश्‍चात्त्य जगात पसरलं, पण ओट्टो फ्रेड्रिक दोहवेडर यानं आयुष्याची सोळा वर्षे खर्च करुन ‘पावकाप्या’ म्हणजे ब्रेडचे एकसारखे स्लाईस करणारं यंत्र तयार करेपर्यंत सँडविचचे दोन काप एकाच जाडीचे असतील याची कधीच खात्री देता येत नसे. त्यानं ब्रेड कापायचं यंत्र बनवायला १९१२मध्ये सुरवात केली. आणखी »ज्ञान विज्ञान

 • ध्यानातील एकतानता

  लोकमत - रवि, १३ एप्रिल २०१४

  ध्यान करण्याच्या कृतीत साधकाला स्वत:चा पूर्ण आढावा घ्यावा लागतो. शरीराचे शौच पाळून मनातील अशुद्ध विचारांना थारा न देता, कुविचारांना किंवा सांसारिक विचारांना बाहेर ठेवून, श्‍वासोच्छ्वासाची गती मंद करीत मनाला शांत ठेवायचे आहे. धारणा म्हणजे बुद्धीवृत्तीनिरोध, तर ध्यान म्हणजे चित्तवृत्तीनिरोध होय. धारणेत स्थानांचे महत्त्व लक्षात घेतल्याने त्यामुळे होणारे स्वत:मधील, स्वत:च्या स्वभावामधील बदल लक्षात घेतल्यास ध्यानाला दिशा मिळते. धारणेत अंतर्गत स्थानमहात्म्य, तर ध्यानात पुढील दिशा वा मार्ग मिळतो. धारणा, ध्यान व समाधी यासाठी स्वस्तिकासन, सिद्धासन, पद्मासन, वीरासन इत्यादी बैठय़ा आसनांची निवड केली जाते. निवडलेल्या आसनात प्रत्याहाराचा पाया स्थिरावत धारणेतून ध्यान साधायचे असते. हातांची प्रथमत: बद्धांजली मुद्रा आणि नंतर ज्ञानमुद्रा धारण करून, त्या बैठय़ा आसनात बसायचे असते. आसनमांडी असताना आसनाभ्यासात काटेकोरपणा पाळत, शरीराचे समत्व साधत, प्राणशक्ती तोलून धरत चोखंदळ राहण्याची प्रयत्नशीलता सांगितली आहे. त्या सर्वांचा आधार घेत; प्राणायामातील उज्जायी करत, मनाला शांत करायचे आहे. मनाची द्वंद्व-स्थिती कमी करत भटकणारे मन शांत ठेवायचे आहे. भगवंताचे स्मरण वा नामस्मरण करीत भगवंताला शरण जायचे आहे. मनाचे सांत्वन करायचे आहे. मनाला चित्तात विरघळवायचे आहे. बुद्धीतील भेदांचे, संशयांचे, दोषांचे निराकरण करायचे आहे. ज्या वस्तूवर ध्यान करायचे आहे, त्या ध्यानवस्तूविषयी संशयाला जागा न ठेवता, भावनिक दोलायमान अवस्था काढून टाकायची आहे.पतंजलींनी या अवस्थेत श्रद्धा, वीर्य, स्मृती आणि समाधीचे भान सुदृढ करण्यास सांगितले आहे. कारण अपयशातही धीर धरणे आवश्यक आहे. पुन्हा पुन्हा प्रयत्नशील राहणे महत्त्वाचे असते. निरनिराळ्य़ा स्थानावर लक्ष केंद्रित करून धारणा केल्याने मन:स्थितीत फरक पडत जातो हे पूर्वीच सांगितले आहे. अशा वेळी चित्त त्या त्या स्थितीपरत्वे रुजत जाते. त्या स्थितीबद्दल आवड, प्रेम व ओढ लागते.विषय-वस्तू हे नाभिस्थान, हृदयस्थान, कंठस्थान, शीर्षमध्य किंवा चक्रस्थाने असू शकेल. ती भगवंताची मूर्तीही असू शकेल. परंतु, ती मूर्ती स्पष्ट होत जाणे आवश्यक आहे. ते मूर्त स्वरूप दृष्टीसमोर आणणे वेगळे आणि त्या मूर्तस्वरूपाला हृदयात धारण करणे वेगळे. डोळे मिटलेल्या स्थितीत असताना, दृष्टी समोर ठेवल्याने भगवंत ही ‘विषय-वस्तू’ होऊन ‘बाह्य वस्तू’ म्हणून चित्त बघत राहते. हेच जर हृदयस्थानी धारण केले, तर ती बाह्य-विषय-वस्तू न राहता ती अंतर्वस्तू होते, हृदयस्थ होते. आणखी »ध्यानातील एकतानता

पृष्ठांकन

(50 वृत्त)